मागील आठवडय़ात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शासकीय तारखेनुसार शिवराज्याभिषेक सोहळा पार पडल्यानंतर आता गेली २० वर्षे रायगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करणाऱ्या संस्थेने १७ व १८ जून रोजी ३४३ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन केले आहे. राज्यातील शिवभक्तांनी त्याची तयारी सुरू केली असून रोपवे रात्रभर सुरू ठेवला जाणार आहे. शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड या संस्थेच्या वतीने हा सोहळा दरवर्षी आयोजित केला जातो.
सहा जून रोजी रायगडावर तारखेनुसार शिवराज्याभिषेक दिन साजरा केला गेला. श्री शिवराज्येभिषेक दिनोत्सव सेवा समिती यांच्या वतीने १७ जून रोजी ज्येष्ठ शुद्ध द्वादशीश गडदेवता माता शिकाई देवीच्या पूजनाने दोन दिवसीय सोहळ्याला सुरुवात केली जाणार आहे. दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता ध्वजारोहणाने शिवराज्याभिषेकाच्या प्रमुख सोहळ्याला सुरुवात होणार असून पहाटे साडेपाच वाजता वेदमंत्रांच्या घोषात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस राज्यभिषेक केला जाणार आहे. त्यानंतर राजदरबार ते जगदीश्वराच्या मंदिरापर्यंत मिरवणूक काढली जाणार आहे. दोन्ही दिवस शिवभक्तांच्या खानपानाची व्यवस्था समितीने नि:शुल्क केली असून रोपवे रात्रभर सुरू ठेवला जाणार आहे. महाड बस स्थानकातून या सोहळ्यासाठी जादा बस सोडल्या जाणार असल्याचे समितीचे अध्यक्ष सुनील पवार यांनी स्पष्ट केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा