मैदानातील सार्वजनिक कार्यक्रमावरून आजी-माजी भाजप नगरसेवकांमध्येच तू तू-मैं मैं

सीवूड्स विभागातील सेक्टर ४६ अ येथील खेळाच्या मैदानावर राष्ट्रवादीतून नुकतेच भाजपमध्ये आलेले नगरसेवक गणेश म्हात्रे यांनी येथील मैदान नागरिकांच्या मागणीनुसार कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाकरिता देऊ  नये बाबतचा प्रस्ताव सहमत करून घेतला होता. त्यामुळे मागील पाच वर्षांपासून भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधव तसेच भाजप युवा अध्यक्ष दत्ता घंगाळे व सहकाऱ्यांमार्फत याच मैदानावर साजरा होणारा नवरात्र उत्सव अडचणीत आला आहे.

सी-वूड्स सेक्टर ४६ अ मध्ये अनेक वर्षांपासून मोठय़ा उत्साहात नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो. परंतु याच मैदानात गणेश म्हात्रे यांच्यामार्फत या मैदानात १० फूट रुंदीचे वॉकवे तयार करणे, तसेच पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यासाठी चारही बाजूंनी नाला बांधणे, तसेच मध्यभागी हॉलीबॉल, बॅडमिंटन, बास्केटबॉल सारखे इनडोअर गेम खेळण्यासाठी व्यवस्था करून सार्वजनिक कार्यक्रमासाठी मैदान भाडय़ाने देणे बंद करण्याचा प्रस्ताव जुलैमध्ये मंजूर करून घेण्यात आला होता. त्यामुळे काही दिवसांवर आलेल्या सार्वजनिक नवरात्र उत्सवासाठी येथे परवानगी मागितली असता महापालिकेने परवानगी नाकारली आहे. त्यामुळे येथे राजकीय वादाला तोंड फुटले आहे.

राष्ट्रवादीतून नुकतेच भाजपमध्ये आलेल्या गणेश म्हात्रे यांचे व भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधव यांच्यामध्ये बुधवारी पालिका मुख्यालयातील चौथ्या मजल्यावर तू तू-मैं मैं झाले, त्यामुळे दोघांनीही एकमेकांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. त्यामुळे शिमग्यापूर्वीच नवरात्रीत राजकीय शिमगा सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. नवी मुंबई शहरातील अनेक मैदानांत सामाजिक कार्यक्रम घेतले जातात. सी-वूड्स येथील सेक्टर ४६, ४६ अ, सेक्टर ५० तसेच ४४ अ मधील विविध उपक्रम याच मैदानावर होतात.

सदर  मैदान सार्वजनिक उपक्रमांसाठी देऊ  नये असा ठराव पास केलेला आहे. परंतु एकीकडे न्यायालयाने सार्वजनिक कार्यक्रम रस्त्यावर घेऊ  नयेत असे निर्देश दिलेले असल्याने सार्वजनिक उपक्रमांसाठी शहरातील १११ नगरसेवकांच्या प्रभागात विविध कार्यक्रम खेळाच्या मैदानात घेतले जातात. परंतु या ठिकाणच्या मैदानात सार्वजनिक कार्यक्रमच घेऊ  नयेत असा ठरवा पास झाल्याने भविष्यात अनेक कार्यक्रमांना अडचण निर्माण होणार आहे.  दरम्यान,  येथील भाजपच्या आजी-माजी नगरसेवकांमध्ये तू तू-मैं मैं सुरू झाले असून शिवीगाळ केल्याबाबत एनआरआय पोलीस ठाण्यात ऐकमेकांविरोधात तक्रार करण्यात आली आहे.

राजकीय अस्तित्वावरून कोंडी करण्याची सुरुवात

विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुका घोषित होणार आहेत. त्यामुळे गणेश नाईक व त्यांच्या नगरसेवकांचा लवाजामा भाजपमध्ये आल्यामुळे आतापासूनच एकाच प्रभागात भाजपचे अनेक इच्छुक  निर्माण झाल्याने राजकीय वादावादीला सुरुवात झाल्याची ही नांदी मानली जात आहे.

सीवूड्समधील या मैदानाच्या भोवतालच्या ज्येष्ठ नागरिकांनी येथे हे कार्यक्रम होऊ  नयेत अशी मागणी केली आहे. तसेच, याच मैदानात इनडोअर गेमचा प्रस्तावही मांडून सहमत झालेला आहे. त्यामुळे फक्त सार्वजनिक कार्यक्रम करता येत नाही म्हणून भरत जाधव व सहकाऱ्यांना पोटदुखी झालेली आहे. नागरिकांच्या मागणीनुसारच आपण प्रस्ताव मांडला होता.-गणेश म्हात्रे, स्थानिक नगरसेवक भाजप

नवी मुंबई शहरातील मैदानात सार्वजनिक कार्यक्रम चालतात. परंतु हिंदूंचा उत्सव साजरा करता येऊ  नये व आपल्या राजकीय अस्तित्वाला धोका निर्माण होईल या भीतीनेच गणेश म्हात्रे यांनी खालच्या पातळीचे राजकारण केले आहे. याबाबत नागरिकांमध्ये स्वाक्षरी मोहीम व वेळ पडल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल.– भरत जाधव, माजी नगरसेवक भाजप