नवी मुंबई : पाच वर्षांपेक्षा अधिक काळ प्रशासकीय राजवट असलेल्या नवी मुंबई महापालिकेत वेगवेगळ्या कंत्राटी कामांच्या निमित्ताने नगरसेवकांचे राज्य अजूनही कायम असल्याचे चित्र आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या धामधुमीत पालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने ‘प्रभावी’ नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधीच्या कामांचा रतीब घातला आहे. असे करताना पालिकेने शहरातील सर्वच राजकीय पक्षांच्या आग्रहाचा ‘मान’ राखला आहे. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सर्वपक्षीय माजी नगरसेवकांना खूश करताना पदपथ, गटारे, संरक्षक भिंती बांधण्यासारख्या कामांचे प्रस्तावही या काळात तयार करण्यात आल्याचे समजते.
कोविडची आलेली साथ आणि त्यानंतर इतर मागासवर्गीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील बहुसंख्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. नवी मुंबई महापालिकेची अखेरची निवडणूक २०१५ मध्ये झाली. महापालिकेत २०२० मध्ये लोकप्रतिनिधींचा कालावधी संपला आणि याच दरम्यान कोविडची साथ आली. तेव्हापासून आजतागयत नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीत. याच काळात राज्यातील राजकारणाने बरेच बदल अनुभवले. नवी मुंबईतही या बदलांचा प्रभाव कमी अधिक प्रमाणात पडलेला पहायला मिळतो. असे असले तरी बहुसंख्य माजी नगरसेवकांनी मात्र पालिकेतील कंत्राटी कामांमध्ये आपला ‘प्रभाव’ कायम राखल्याचे पहायला मिळत आहे. गेल्या वर्षभरात महापालिका हद्दीतील ८० पेक्षा अधिक नगरसेवकांच्या प्रभागांत महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने ५०० कोटींपेक्षा अधिक विकासकामे केली आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर तर माजी नगरसेवकांच्या प्रभागानुसारच कामांचे प्रस्ताव तयार करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.
हे ही वाचा… उरण-नेरुळ -बेलापूर रेल्वेवर फुकट्यांचा प्रवास, दिवसाची एक लाखांची तिकीट विक्री ५० हजारांवर
शिंदेसेना खुशीत, नाईक समर्थकांनाही महत्त्वाचा वाटा
पाच वर्षांपूर्वी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार राज्यात येताच नगरविकास मंत्रिपदाची माळ एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात पडली. तेव्हापासून नवी मुंबई महापालिकेत त्यांचा प्रभाव वाढू लागला असून शिंदे यांच्यामुळे त्यांच्या समर्थक माजी नगरसेवकांनाही प्रभागांमध्ये भरभरुन निधी मिळाला. शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद आले. त्यानंतर त्यांचे समर्थक असलेले सुरेश कुलकर्णी (रस्ते बांधणी, संरक्षण भिंतीची उभारणी), शिवराम पाटील (रस्त्यांची बांधणी, पदपथांचे काँक्रीटीकरण), राम आशिष यादव (गटार, पदपथ सुधारणा), विजय चौगुले, सरोज पाटील, विलास भोईर अशा प्रमुख माजी नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये २५ कोटींपेक्षा अधिक रकमेचे प्रस्ताव तयार झाले आहेत. शिंदे यांची राज्यात चलती असतानाही ऐरोलीचे आमदार आणि विद्यमान वनमंत्री गणेश नाईक यांनी आपल्या समर्थकांसाठी महापालिकेत आग्रही भूमिका घेतल्याने जयवंत सुतार, रविंद्र इथापे, रंजना सोनावणे, सुधाकर सोनावणे, उषा पाटील, शशिकला सुतार, विनोद म्हात्रे, दशरथ भगत यांचा प्रभाव असलेल्या तीन प्रभागांनाही मोठा निधी मिळाला आहे.
कामांवर माजी नगरसवेकांचाच प्रभाव
शिंदे यांचे तुर्भे येथील कडवे समर्थक सुरेश कुलकर्णी यांच्या प्रभागात सर्वाधिक निधी वापरला गेला असून रस्त्याचे काँक्रीटीकरण आणि पावसाळी गटार बांधण्याच्या एका कामाचा प्रस्तावावर ३५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. यासंबंधी महापालिकेचे शहर अभियंता शिरीष आरदवाड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करुनही होऊ शकला नाही.
हे ही वाचा… नैना प्रकल्प यशस्वी करण्यासाठी सिडकोचे शेतकऱ्यांना आवाहन
महापालिकेत प्रशासकीय राजवट कार्यरत असली तरी वेगवेगळ्या प्रभागांमधील जनतेचे अनेक प्रश्न घेऊन स्थानिक लोकप्रतिनिधी आयुक्त तसेच अधिकाऱ्यांना भेटत असतात. शहरात मोठ्या प्रकल्पांची उभारणी होत असताना गल्लीबोळातील रस्ते, गटारे, पदपथांची कामे होणेही तितकेच महत्वाचे ठरते. नागरिकांच्या रोजच्या वापरासाठी आवश्यक सुविधांची मागणी केल्यावर त्यासंबंधीचे प्रस्ताव प्रशासन तयार करत असेल तर त्याचे स्वागतच करायला हवे. – सुरेश कुलकर्णी, माजी नगरसेवक शिवसेना (शिंदे)