राज्यातील एक श्रीमंत पालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई पालिकेच्या चालू वर्षांतील अंदाजपत्रकावर चर्चा करण्यासाठी शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या सभेत अखेर ११५ नगरसेवकांपैकी केवळ ४५ नगरसवेक हजर असल्याची बाब उघडीस आली आहे. शनिवार, रविवार सहलीचे बेत आखलेल्या या नगरसेवकांना शहरातील नागरिकांच्या करावर आधारित आवक-जावकचे ठोकताळे बांधण्यापेक्षा चिअर्सचे पेले रिचवणे महत्त्वाचे वाटले असल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे. त्यात श्रीलंका व भारत क्रिकेट संघांदरम्यानचा सामनाही कारणीभूत ठरला.
दोनशे कोटीपेक्षा जास्त रक्कम खर्च करून नवी मुंबई पालिकेने बेलापूर येथे आलिशान मुख्यालय बांधले असून त्यात दीडशे सदस्यांना सामावून घेऊ शकेल असे अद्ययावत सभागृह आहे. पालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दोन आठवडय़ापूर्वी सादर केलेल्या एक हजार ९७५ कोटी रुपये जमा व जवळपास तेवढय़ाच खर्चाच्या अर्थसंकल्पावर शनिवारी सर्व सदस्यांची मते ऐकून घेण्यासाठी महासभा आयोजित करण्यात आली होती. त्यात संध्याकाळपर्यंत जेमतेम ६० सदस्यांनी भाग घेऊन ३६ कोटी रुपयांची घसघशीत वाढ केली. त्यानंतर रात्री दहापर्यंत चालणाऱ्या या सभेत अखेर केवळ २५ टक्के सदस्य कायम राहिले होते.
नगर सचिव विभागाने शनिवारी या सभांचे आयोजन केल्याने नाराज असलेल्या पुरुष नगरसेवकांनी दुपारीच काढता पाय घेतला. त्यामुळे अनेकांची पावले कर्जत, अलिबाग, पनवेल आणि लोणावला येथील स्वत:च्या किंवा मित्रांच्या फार्महाऊसकडे वळल्याची चर्चा आहे.
त्यामुळे शहरातील सेवासुविधांवर होणाऱ्या खर्च आणि कामांवर चर्चा करण्यासाठी देश व राज्य पातळीवर चर्चा करण्यासाठी ही सर्व मंडळी सहलीनिमित्ताने बाहेर पडली, तर काही जणांनी क्रिकेट सामन्यांचा आनंद लुटण्यासाठी घरीच तळ ठोकल्याची चर्चा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Councillors watching cricket match
Show comments