लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पनवेल : पनवेल विधानसभा निवडणूकीच्या निकालाची मतमोजणी शनिवारी सकाळी आठ वाजता शहरातील कर्नाळा स्पोटर्स अकादमीसमोरील ए.आर. कालसेकर पॉलिटेक्नीक महाविद्यालयात केली जाणार आहे. याच महाविद्यालयात ६०४ इव्हीएम (मतदान) यंत्र पोलीस बंदोबस्तामध्ये सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. सकाळी ८ वाजल्यापासून या मतदान यंत्रांमधून निवडणूक विभागाचे अधिकारी मतमोजणीला सुरुवात करतील. ७५ सीसीटिव्ही कॅमेरांचे लक्ष या मतमोजणीवर राहणार आहे. तसेच विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आपसात भिडू नयेत, यासाठी प्रत्येकी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना उभे राहण्यासाठी वेगवेगळी जागा पोलिसांनी नेमून दिली आहे.
    
पनवेल विधानसभा क्षेत्रात ६,५२,०६२ मतदार असून त्यापैकी ३,८२,३३५ मतदारांनी मतदान केले आहे. ५८.६३ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक विभागाने गुरुवारी सायंकाळी जाहीर केली. ६०४ मतदान यंत्रातील मतमोजणीसाठी २५ फेऱ्यांचे नियोजन निवडणूक विभागाने आखले आहे. संपुर्ण मतमोजणीच्या प्रक्रियेसाठी महाविद्यालयाच्या इमारतीवरील मजल्यावर ५० आणि खालच्या मजल्यावर २५ असे ७५ सीसीटिव्ही कॅमेरांच्या देखरखीखाली ही मोजणी केली जाणार आहे.

आणखी वाचा-पारगाव येथील वादग्रस्त बांधकामावर सिडकोचा हाताेडा

इव्हीएम यंत्र ठेवण्यासाठी २४ टेबल मतमोजणी ठिकाणी लावण्यात आले असून ८ टेबलवर पोस्टल बॅलेट तर १ टेबलवर सैनिकांकडून आलेल्या मतपत्रिकेच्या मोजण्यासाठी लावले आहेत. प्रत्येक टेबलवर ३ पर्यवेक्षक, पोस्टल बॅलेटच्या मोजणीसाठी ९ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि तसेच इव्हीएम यंत्र मोजणीच्या प्रत्येक टेबलवर चार सहाय्यक निवडणूक अधिका-यांसह एक निवडणूक प्रादेशिक अधिकारी असणार आहेत. मतदान यंत्र आणण्यापासून ते मतमोजणीच्या सर्व कामासाठी साडेतीनशे इतर कर्मचा-यांचे नियोजन केले आहे. ही मतमोजणी निरीक्षक दुनी चंद्र राणा यांच्या उपस्थितीत पनवेलचे निवडणूक निर्णय अधिकारी पवन चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय पाटील, संजय भालेराव यांच्यासमोर पार पडेल. 

आणखी वाचा-पैसे वाटप संशयावरून कोपरखैरणेत हाणामारी 

मतदान झाल्यापासून कालसेकर महाविद्यालयात इव्हीएम यंत्र ठेवल्यामुळे महाविद्यालयाच्या परिसराला छावणीचे रुप आले आहे. या परिसरात कडेकोट सूरक्षा तैनात केली आहे. स्ट्रॉंग रुम (सूरक्षित खोली) संकल्पनेव्दारे मुख्य खोलीला कमांडो प्रशिक्षण घेतलेल्यांचे संरक्षण कडे तसेच पोलीस बंदोबस्ताचे दोन कडे उभारले आहे. सीसीटीव्ही कॅमेराचे जाळे स्ट्रॉंग रुमला उभारले आहे. मतमोजणीपूर्वी हे सूरक्षेचे कडे बाजूला सारुन मतदान प्रक्रियेतील उमेदवार व त्यांच्या सहका-यांच्या उपस्थितीमध्ये मतमोजणीला सूरुवात केली जाईल.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Counting of votes in panvel under tight police security mrj