नवी मुंबई : नवी मुंबईसारख्या आधुनिक शहरात गावठी दारू विकली जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. भिवंडी आणि मुंबई येथे काही वर्षांपूर्वी गावठी दारू पिऊन शेकडो लोकांचा बळी गेल्याचा प्रकार घडल्यानंतर पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाचे खाडकन डोळे उघडले होते. त्यानंतर मात्र मुंबई आणि परिसरात गावठी दारूवर चांगल्यापैकी नियंत्रण मिळवण्यात आले होते. लोकांनी गावठी दारू पिऊ नये म्हणून देशी दारूच्या दरात घट करण्याचा विचारही समोर आला होता. मात्र, एवढ्या वर्षांनी पुन्हा गावठी दारूचा व्यवसाय सुरू असल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा – नवी मुंबईत भव्य हिंदू जन आक्रोश मोर्चा; लव्ह जिहाद, धर्मांतरविरोधात कायदा करण्याची मागणी
नेरूळ येथील एका झोपडपट्टीत गावठी दारू विक्री होत असल्याची माहिती गस्तीवर कार्यरत असलेले पोलीस शिपाई प्रसाद काजळे यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. काजळे आणि गजानन नाईक हे नेरूळ पोलीस ठाणे क्षेत्रातील शिरवणे येथे गस्त घालत असताना ही माहिती मिळताच त्यांनी नेरूळ जिमखाना नजीक झोपडपट्टीत जाऊन शोध घेतला. त्यात एक महिला पाण्याच्या पाच लिटरच्या दोन बाटल्यांत गावठी दारू विकताना आढळून आली. तिला विचारणा केली असता तिने ही गुळाने बनवलेले गावठी दारू असल्याची कबुली दिली. जचेन्द्र पवार, असे तिचे नाव असून ती बुढ्ढी म्हणून ओळखली जाते. या दारूचे नमुने पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, ५० हजार रुपयांची गावठी दारू जप्त करण्यात आली आहे.