उरण : विदेशात निर्यात होणाऱ्या करंजा बंदरात वैयक्तिक मच्छिमारांकडून पकडण्यात येणाऱ्या शेवंड (लॉबस्टर) आणि मोठ्या आकारांचे खेकडे यांच्या दरात वाढ झाली आहे. यात किलोला १७०० असलेला दर दोन हजार झाला आहे. तर खेकड्यांच्या दरातही वाढ झाली आहे. याचा लाभ स्थानिक मच्छिमारांनाही होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उरणच्या करंजा बंदरात पकडण्यात आलेल्या शेवंडी आणि खेकड्यांना जागतिक बाजारात प्रचंड मागणी आहे. त्यामुळे सध्या या दोन्ही माशांची आवक कमी झाली आहे. परिणामी या दोन्ही माशांचे दर वाढले आहेत. गेल्या काही वर्षांपासून शेवंडी किलोला १२०० ते १७०० रुपये असलेला दर १९०० ते २ हजार रुपयांवर पोहचला आहे. करंजा मधील शेवंड आणि खेकडे हे अमेरिका,सिंगापूर यासह देशातील सात व पंचतारांकित हॉटेलमध्ये सर्व्ह केल्या जातात. अरबी समुद्र किनाऱ्यावर वसलेल्या करंजा बंदर परिसरात अनेक छोटे मच्छिमार शेवंड आणि खेकडे पकडण्याचा व्यवसाय करीत आहेत. यासाठी मच्छिमारांना अनेक तास लागत आहेत. पारंपरिक मच्छीमारांना आर्थिक फायदा मिळवून देणारी आणि आखाती देशात मोठ्या प्रमाणावर मागणी असलेल्या शेवंड (लॉबस्टर) आता मिळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे स्थानिक मच्छीमार अडचणीत आले आहेत.

हेही वाचा…राहत्या घरांचे भवितव्य काय? उरण, पनवेल आणि पेणमधील शेतकऱ्यांचा सरकारला सवाल

जगभरातील सर्वच समुद्रात शेवंड आढळतात. खडकाळ, वाळूमय किंवा गढूळ पाण्यात तसेच खोल समुद्रात शेवंड आढळून येतात. शेवंडाचे काटेरी व बिनकाटेरी असे प्रकार आहेत. हिंदी महासागरात त्यांच्या ५ जाती आढळतात. समुद्रातील खडकाळ किनाऱ्यावर अथवा वाळूमय पाण्याच्या ठिकाणी या शेवंड आढळून येतात.स्थानिक मच्छीमार छोट्या होड्यांनी शेवंड मासळी पकडतात. १ नंबर सदरात मोडणारी शेवंडीचे वजन ३०० ते १५०० ग्रॅम भरते. १९०० ते २००० रुपये किलो प्रति दराने या शेवडींची घाऊक बाजारात विक्री होते.१०० ते २५० ग्रॅम वजनाची शेवंड २ नंबरच्या सदरात मोडते. गुजरात, अलिबाग, वरळी, मुरुड, श्रीवर्धन, रेवदंडा व इतर परिसरातुन शेकडो स्थानिक मच्छीमार शेवंड (लॉबस्टर) विक्रीसाठी घाऊक बाजारात घेऊन येतात. दररोज सुमारे ४५० ते ५०० किलो शेवंड खरेदी करतो. त्यानंतर निर्यात कंपनीच्या व्यापाऱ्यांना विक्री केली जाते.

हेही वाचा…आवक घटल्याने टोमॅटो, मटारच्या दरात वाढ

शेवंडाचे मांस रुचकर

शेवंडाचे मांस अत्यंत रुचकर असून खाण्यासाठी ते ताजे अथवा गोठवून वापरतात. देशभरातील पंचतारांकित हॉटेल आणि आखाती देशात या शेवंडीला मोठी मागणी आहे. मात्र मोठ्या प्रमाणावर मागणी असली तरी समुद्रात मागील काही वर्षांपासून शेवंड मिळण्याच्या प्रमाणात मोठी घट झाली आहे. त्यामुळे स्थानिक मच्छीमारांकडूनही मागणी प्रमाणे शेवंडींचा पुरवठा होत नाही. परिणामी पुरवठा होत नसल्याने मागणी असुनही निर्यात कंपन्यांना शेवंडींचा पुरवठा करणे शक्य होत नाही.

दिवसाकाठी एक-दोन किलो शेवंड मिळाल्यास स्थानिक मच्छीमारांसाठी शेवंडीचा व्यवसाय अत्यंत फायदेशीर ठरतो. मात्र सध्या समुद्रात शेवंड मिळण्याच्या प्रमाणात मोठी घट झाली आहे. त्यामुळे स्थानिक आणि पारंपरिक मच्छीमारांना आर्थिक फायदा मिळवून देणारा व्यवसाय सध्या तरी अडचणीत आला आहे. निलेश कोळी, मच्छीमार

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crab and lobster prices increased at karanja port uran due to high global demand sud 02