एक कोटी ६० लाख रुपये खर्चुन दिघा येथे स्मशानभूमी बांधली तीही अर्धवट. त्यानंतरही तिचे बांधकाम पूर्ण करून नागरिकांची सोय करावी, अशी भूमिका घेण्याऐवजी येथील राजकीय नेत्यांची समाजकल्याणाची भूमिका लोकांच्या मनावर अधिक प्रभावीरीत्या ठसविण्याच्या प्रयत्नात आमदार संदीप नाईक यांच्या हस्ते स्मशानभूमीचे उद्घाटनही करण्यात आले; परंतु या स्मशानभूमीचे बरेचसे काम अपूर्णावस्थेत असून ते आता हाती घेण्यात आले आहे. याचा फटका अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना बसत आहे.
दिघा स्मशनभूमीच्या अद्ययावत उभारणीच्या कामाला ऑक्टोबर २०१३ मध्ये सुरुवात झाली; मध्यंतरी नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या. निवडणुकांच्या तोंडावर राजकीय नेत्यांना विकासकामे करून दाखवल्याची घाई लागल्याने स्मशानभूमीचे उद्घाटनही घाईघाईत आटोपून घेण्यात आले. संदीप नाईक यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला.
पालिका प्रशासन आणि ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे दिघा स्मशनभूमीचे काम संथगतीने सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. हे काम डिसेंबर २०१५ पर्यंत पूर्ण होणार असल्याचे उप अंभियता सुहास टकले यांनी सांगितले होते. डिसेंबर उलटून दीड महिना होत आला तरी काम पूर्ण झालेले नाही. या कामात आजवर तीन ठेकेदार बदलण्यात आले आहेत. त्यामुळे अशा ठेकेदारांना काळया यादीत टाकण्याची मागणी करण्यात येणार आहे. यावर पालिका अधिकाऱ्यांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही.
चार किलोमीटर अंतरावरील दिघा परिसरातील गणपती पाडा, आनंद नगर, रामनगर, इलठण पाडा, विष्णुनगर येथील नागरिकांची दिघा स्मशानभूमीमुळे सोय झाली आहे. स्मशानभूमीत पिण्याच्या पाण्याची सोय नाही. तसेच नागरिकांसाठी स्वच्छतागृह अद्याप खुले करण्यात आलेले नाही. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. काम वेळेत पूर्ण न झाल्याने नगरसेवक नवीन गवते यांनी पालिका आयुक्तांकडे ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली होती.

Story img Loader