Crime News नवी मुंबई पोलिसांनी १९ वर्षांच्या एका मुलीला आणि तिच्या मित्राला अटक केली आहे. एका टॅक्सी चालकाची हत्या केल्याचा आरोप या दोघांवर आहे. हा टॅक्सीचालक मुलीला ब्लॅकमेल करत होता. तिच्याकडे त्याने शरीरसुखाची मागणी केली होती. त्यामुळे या दोघांनी टॅक्सीचालकाची हत्या केली असा आरोप आहे. हत्या केल्यानंतर या दोघांनीही संगमनेर या ठिकाणी जाऊन पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केलं. रिया सरकल्याणसिंग आणि तिचा मित्र विशाल शिंदे या दोघांना पोलिसांनी सुरेंद्र पांडे या टॅक्सी चालकाच्या हत्येप्रकरणी अटक केली.
पोलिसांनी घटनेबाबत काय सांगितलं?
पोलिसांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार रिया ही मूळची पंजाबची आहे. ती नवी मुंबईतल्या उल्वेमधल्या सेक्टर २४ या ठिकाणी ती राहात होती. सुरेंद्र पांडे रियाला त्याच्या टॅक्सीने ऑफिसला सोडत असे. तसंच तू जागा शोधत असशील तोपर्यंत माझ्या घरी राहू शकतेस असंही त्याने तिला सांगितलं होतं. त्यानुसार ती त्या ठिकाणी राहात होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २ एप्रिलला विशाल सुरेंद्र पांडेच्या घरी रियाला भेटायला आला होता. हे दोघं एकांतात होते त्यावेळी सुरेंद्र पांडेने या दोघांचे काही व्हिडीओ चित्रीत केले. हे व्हिडीओ दाखवून सुरेंद्र पांडे रियाला ब्लॅकमेल करु लागला. तो तिच्याकडे व्हिडीओ देण्याच्या बदल्यात शरीरसुखाची मागणी करु लागला.
सुरेंद्र पांडेवर हातोडीचे वार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यानंतर या तिघांमध्ये वाद वाढला आणि विकोपाला गेला. ज्यानंतर दोघांनीही टॅक्सीचालकावर सुरेंद्रवर हातोडीने वार केले. वार केल्यानंतरही दोघं घाबरले आणि त्यांनी विशालचं गाव असलेल्या संगमनेरला पलायन केलं. विशालच्या घरातल्यांना जेव्हा हा सगळा प्रकार कळला तेव्हा या दोघांना घेऊन त्यांनी पोलीस ठाणं गाठलं. पोलिसांना सगळा प्रकार सांगितला. यानंतर संगमनेर पोलिसांनी उल्वे येथील नवी मुंबई पोलिसांना संपर्क केला. सुरेंद्र पांडेचा मृतदेह पोलिसांना त्याच्या घरात ६ एप्रिल रोजी कुजलेल्या अवस्थेत मिळाला. सुरेंद्रचा मृत्यू होऊन तोपर्यंत चार दिवस उलटले होते. त्यानंतर नवी मुंबई पोलिसांचं एक पथक संगमनेरला गेलं. त्यानंतर या दोघांना नवी मुंबईत आणण्यात आलं.
रिया सुरेंद्रच्या घरातच राहात होती
रिया पंजाबहून काही आठवड्यांपूर्वीच मुंबईत नोकरीसाठी आली होती. तर सुरेंद्र पांडे हा मूळचा उत्तर प्रदेशातील प्रयागराजचा रहिवासी होता. उल्वे सेक्टर २४ या ठिकाणी असलेल्या क्रियांश रेसिडन्सी या इमारतीत तो एकटाच राहात होता. ओला कार चालवून तो उदरनिर्वाह करत असे. रिया आणि सुरेंद्रची ओळख काही दिवसांपासून झाली होती. तिला राहण्यासाठी घर नसल्याने सुरेंद्रने तिला त्याच्या घरातआसरा दिला होता. विशाल आणि रिया यांचे शारिरीक संबंध आले होते ते सुरेंद्र पांडेने मोबाइलमध्ये चित्रीत केले आणि ते व्हिडीओ दाखवून तो रियाकडे शरीर सुखाची मागणी करत होता. दोघांनी त्याची हत्या केल्यानंतर त्याचीच कार घेऊन ते संगमनेरला पळाले होते अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे.