लोकसत्ता प्रतिनिधी
नवी मुंबई : सण आला की दुकानासमोर असलेल्या झाडाला खिळे ठोकून जाहिरात किंवा रोषणाई करणाऱ्यांवर आता महापालिकेची नजर राहणार आहे. झाडांचे विद्रुपीकरण करणाऱ्या ४० जणांना आतापर्यंत नोटीस पाठवण्यात आल्या असून तीन जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शहरात अनेक ठिकाणी विषेशत: बाजार ठिकाणी असणारे दुकानदार दुकानासमोरील झाडाला खिळे ठोकून दुकानाचे नाव आणि दिशा दाखवणारा बाण, विशेष सूट असे फलक लावतात. याबाबत पर्यावरण प्रेमी नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या आहेत. मात्र त्याची आतापर्यंत दखल घेतली जात नव्हती. यंदा मात्र मनपा आयुक्तांनी याची दखल घेतली असून झाडांवर खिळे ठोकणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या दोन महिन्यांत अशा ४० पेक्षा अधिक लोकांना नोटीसा बजावल्या आहेत तर तीन जणांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आणखी वाचा-शीव पनवेल महामार्गावर तेलाचा कंटेनर उलटल्याने वाहतूक कोंडी
झाडांवर विद्युत रोषणाई करणे आणि त्यावर खिळे ठोकून जाहिराती करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रीय हरित लवाद आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे. दरम्यान ज्यांनी अशाप्रकारे जाहिरातबाजी केली आहे त्यांनी सात दिवसांमध्ये या जाहिराती काढून टाकाव्यात अशा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
झाडांवर खिळे ठोकून जाहिराती करणाऱ्या दुकान चालकावर मनपाने दंड ठोठावावा तसेच एक तरी झाड लावून त्याची निगा राखावी अशी शिक्षा देणे आवश्यक आहे. अनेकदा मनपाने पाठवलेल्या नोटीशीला केराची टोपली दाखवण्यात येते तर अदखलपात्र गुन्ह्यांची दखल आरोपी दुकानदार घेत नाहीत. त्यामुळे ठोस कारवाई अपेक्षित आहे, अशी अपेक्षा पर्यावरण सेवा भावी संस्थाचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी व्यक्त केली. तर आपण नियमाप्रमाणे कारवाई करीत असून असे काही कुठे निदर्शनास आले तर जवळच्या विभाग कार्यालयाशी संपर्क साधून माहिती देण्यात यावी असे आवाहन वृक्ष प्राधिकरण उपायुक्त नेरकर यांनी केले आहे.