पनवेल: मागील आठवड्यात एका प्रभाग अधिकारी व ग्रामस्थामध्ये बेकायदा बांधकामाच्या कारवाईवरुन वाद झाल्यानंतर शिविगाळीची ध्वनीफीत समाजमाध्यमावर पसरली होती. यानंतर पनवेल पालिका अॅक्शन मोडवर आली असून यापूढे ग्रामीण भागात बेकायदा बांधकाम करणा-यांवर पालिकेने थेट फौजदारी गुन्हे नोंद करण्याचा पवित्रा घेतला आहे. तळोजा परिसरातील सिद्धिकरवले गावामधील एका ग्रामस्थावर बुधवारी पालिकेने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगररचना अधिनियमाअंतर्गत हा गुन्हा नोंदविला आहे.
सिद्धीकरवले गावातील रामचंद्र मढवी यांनी पनवेल महापालिकेची आवश्यक परवानगी न घेता बांधकाम केल्यामुळे महापालिकेच्या नावडे प्रभाग कार्यालयातर्फे सह आयुक्तांनी मढवी यांना यापूर्वी नोटीस बजावली होती. त्यानंतरही मढवी यांनी बांधकाम सूरु केल्यामुळे तळोजा पोलीस ठाण्यात मढवी यांच्याविरोधात मालमत्ता क्रमांक ३४०,३४१, ३४२,३४३,३४६, ३४७ यावर बांधकाम केल्यामुळे गुन्हा नोंदविला आहे. पनवेल महापालिकेच्या कारभारामध्ये सूसुत्रता व पारदर्शकता आणण्यासाठी पालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी पालिकेचे सहआयुक्त आणि प्रभाग अधिका-यांना कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना मागील आठवड्यात दिल्या होत्या.
हेही वाचा >>>अखेर तळोजातील औद्योगिक वसाहतीमध्ये वाहनतळ सुरू
चौकटपनवेल पालिका स्थापन होऊन हे आठवे वर्षे सूरु असून पालिका क्षेत्रातील ग्रामीण परिसराचा गावठाणातील बांधकामांचा सर्वे अद्याप झाला नाही. अनेक गावक-यांनी या सर्वेला विरोध केल्याने सर्वेक्षणाचे काम रखडले आहे. सर्वेक्षण न झाल्याने पालिका संबंधित मालमत्ताधारकांना प्रोपर्टी कार्ड देऊ शकली नाही. प्रोपर्टी कार्ड नसल्याने जुने घर बांधण्यासाठी व घरांच्या दुरुस्तीवेळी पालिकेच्या आवश्यक परवानगी मिळत नसल्याने महापालिकेपूर्वी बांधलेली बांधकामे बेकायदा ठरत आहे.