नवी मुंबई: एपीएमसी पोलिसांनी बेकायदा शस्त्र  बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक केले असून दोघेही सराईत गुन्हेगार असल्याचे चौकशीत समोर आले आहे. तेजस राजाराम वरेकर आणि  ओमकार शिवाजी हांडे असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दोन सराईत आरोपी एपीएमसी परिसरात आढळून आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक तन्वीर शेख यांना मिळाली या माहितीच्या आधारावर त्यांनी तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली पथक त्या आरोपींना शोधण्यास धाडले.

माहितगाराने दिलेल्या माहितीनुसार तुर्भे सेक्टर २३, जनता मार्केट येथे संशयित इसम कार मध्ये आढळून येताच त्याला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. त्यांची अंगझडती घेतली असता  तेजस राजाराम वरेकर याच्या कडे १० हजार रुपयांचे लोखंडी बनावटीचा लाकडी मूठ असलेले  १६ से. मी बॅरलची लांबीचा देशी कटटा आणि एक जीवंत  काडतूस आढळून आले. तसेच ५०० रुपयांची एक तलवार ओमकार शिवाजी हांडे याच्या कडे आढळून आली. गाडी आणि हि शस्त्रे  जप्त करण्यात आली आहेत. आरोपींवर या पूर्वी तीन गुन्ह्यांची नोंद आर.ए. के पोलीस ठाण्यात आहे. अशी माहिती एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तन्वीर शेख यांनी दिली.