पनवेल : नवीन पनवेल वसाहतीमधील रेशनदूकानावर कमी उत्पन्न असूनही रेशन मिळत नसल्याने दूकानदार व कार्डधारक यांच्यात जुंपली. पनवेल नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष सूनील घरत आणि त्यांचे १० सहकारी कार्डधारकांसोबत जाब विचारण्यासाठी गेल्यावर दूकानदाराला शिविगाळ व मारहाणीचा प्रकार गुरुवारी रात्री घडला. याबाबत मध्यरात्री माजी नगराध्यक्ष घरत आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला. लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता सूरु आहे. आचारसंहिते दरम्यान राजकीय पक्षांच्या नेत्यांचा दबाव सरकारी लोकसेवक जुमानत नाहीत. नवीन पनवेल वसाहतीमधील सेक्टर १३ येथील जनता मार्केटमध्ये रोशन किर्तीकर यांचे रेशनदूकान आहे.
हेही वाचा >>> पनवेलमधील शोरुममध्ये पावणेदोन लाखांची चोरी
गुरुवारी रात्री साडेआठ वाजताच्या दरम्यान एका महिलेला उत्पन्न कमी असतानाही रेशन मिळाले नाही. म्हणून या महिलेने रेशनदूकानदारांकडे तक्रार केली. दूकानदार रोशन यांनी पुरवठा विभागाने दिलेल्या यादीनूसारच रेशन देऊ असे सांगीतल्याने तेथील रेशनकार्डधारक संतापले. त्यांनी याबाबतची तक्रार शेजारच्या माजी नगराध्यक्ष सूनील घरत यांच्या कार्यालयात केल्यावर काही मिनिटांत घरत व त्यांचे सहकारी दूकानदाराला जाब विचारण्यासाठी आले. घरत व दूकानदार यांनी पुरवठा अधिकारी प्रदीप कांबळे यांच्यासोबत फोनवर चर्चा केली. मात्र तरीही तोडगा निघाला नाही. या दरम्यान इतर कार्डधारकांनाही रेशन मिळत नसल्याने त्यांनी दूकानदार रोशन किर्तीकर यांना धक्काबुक्की व शिविगाळ केल्याने दूकानदाराने पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदविली. सूनील घरत हे सध्या भाजपचे पदाधिकारी असून ते माजी मंत्री गणेश नाईक यांचे निकटवर्तीय आहेत.