नवी मुंबई: नवी मुंबईत खास चोरी करण्यासाठी कर्नाटक हून नवी मुंबईत येणाऱ्या त्रिकूटास रबाळे पोलिसांनी अटक केले आहे. यात एका महिलेचाही समावेश असून यातील एका आरोपीने मुका असल्याचे सोंग घेतले होते, मात्र पोलिसी हिसका बसताच हा मुका आरोपी बोलका झाला आणि एका पाठोपाठ सात गुन्हे केल्याची कबुली दिली.
शिवराजा डी. टी लिपेशा उर्फ शिवराज तिपेक्षा पवार, अनाप्पा कुपारणा बढार, सुंद्रा मांझा वडार उर्फ सुंदरमा माझा असे अटक आरोपीची नावे आहेत. यातील शिवराजा हा सज्ञान होऊन १४ दिवस झालेले आहेत तर अनाप्पा शेतकरी आहे. यातील महिला आरोपी सुंद्रा ही कचरा वेचक आहे. स्वाळे पोलीस ठाणे हद्दीतून घराच्या उघड्या दरवाजातून आतमध्ये प्रवेश करून लॅपटॉप मोबाईल फोन चोरी होण्याच्या प्रमाणात वाढ झाली होती. त्या अनुशंगाने विशेष पथक नेमून तपास सुरु करण्यात आला होता.
आणखी वाचा- उरणच्या महानिर्मितीमध्ये ‘सीआयटीयू’ची संघटना, कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार
सात एप्रिलला गस्त पोलिसांना आरोपी हे संशयास्पदरित्या फिरत असताना आढळून आले. यातील शिवराजाकडे “गव्हरमेंट ऑफ इंडिया ऑरफज चॅरीटी हायस्कुल वूमन वेलफेअर कन्ननुर केरल व रिस्पेक्टटेड टु पब्लीक असे गव्हमेंट ऑफ इंडीया मिनीस्ट्री ऑफ सोशल वुमन वेल्फर औरयोज चॅरीटी डंब अॅण्ड डम्ब कॉलेज मलकपेट हैद्राबाद (आंध्रप्रदेश)” असा मजकुर असलेले कागद सापडले. पोलिसी हिसका बसताच आरोपींनी चोरीची कबुलीही दिली. त्यांनी दिलेल्या माहितीवरून गुन्हा घडलेल्या ठिकाणाचे सीसीटीव्ही पाहणी केली असता सीसीटीव्ही फुटेजमध्ये लॅपटॉप चोरी करणारे आरोपी हेच असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी भद्रावती राज्य कर्नाटक येथे जावून ४ लॅपटॉप व २ मोबाईल फोन जप्त केले. तसेच बोलता न येणारा आरोपी शिवराजा यालाही पोलिसी हिसका देताच बोलण्यास सुरुवात करत ७ चोरींची माहिती दिली. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक खरात हे करीत आहेत.
गुन्हे पद्धत
महिला आरोपी घरांची रेकी करून ही माहिती अन्य दोघांना देत होती. त्यानंतर दोन्ही आरोपी हातामध्ये त्या घरात जाऊन चोरी करीत होते. जर योजना फसली तर सोबतचे चॅरीटी लेटर हेड दाखवून मदतीचे आवाहन करीत होते. चोरी केलेले लॅपटॉप व मोबाईल फोन हे कर्नाटक, तामिळनाडू व गोवा परिसरात आयटी व शैक्षणिक क्षेत्र असल्याने तेथे लॅपटॉप यांची मागणी जास्त प्रमाणात असल्याने साथीदार यांच्या मार्फत विक्री करत होते. जर विक्री झाली नाही तर त्याचे सुटे भाग करून येईल तेवढ्या पैशात विकत होते. तसेच मिळालेले पैसे आपसात वाटप करून खर्च करीत होते. अशी माहिती पोलीस उपयुक्त विवेक पानसरे यांनी दिली. .