विरारला थरारनाटय़; बहिणीच्या साथीने ८१ साखळी चोरी
नवी मुंबई : नवी मुंबई खंडणी विरोधी पथकाच्या हातावर तुरी देत साखळी चोरीतील अट्टल गुन्हेगार पळून गेला. पोलिसांनी रचलेला सापळा त्याने भेदून पलायन केले असले तरी पोलिसांवर गोळ्या झाडण्यासाठी प्रवृत्त करणारी त्याची बहीण आणि आजीला पोलिसांनी अटक केले आहे. हे थरारनाटय़ विरार येथे घडले असून पळून गेलेल्या आरोपीच्या नावावर तब्बल ८१ साखळी चोरीचे गुन्हे आहेत. त्यापैकी ५५ गुन्हे हे नवी मुंबईतील आहेत. यापूर्वीही गुजरात सीमेवर त्याने नवी मुंबई पोलिसांना चकवा दिला होता.
नवी मुंबई पोलिसांना अनेक वर्षांपासून अट्टल साखळी चोर फैयाज शेख हा हवा होता. नवी मुंबईत त्याने तब्बल ५५ साखळी चोरी केली होती. हे गुन्हे करीत असताना अनेक ठिकाणी तो सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. हाच फैयाज याने खारघर येथे साखळी चोरी केल्याचे ‘सीसीटीव्ही’तून समोर आले. पोलिसांनी त्वरित त्याला पकडण्यासाठी हालचाल सुरू केली असता तो मोटारीने गुजरातच्या दिशेने जात असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांना मिळाली. त्याला पकडण्यासाठी त्वरित वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे, शिरीष पवार, निवृत्ती कोल्हटकर संदीपान शिंदे, साहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल राख, नीलेश तांबे, विक्रांत थारकर आदी कर्मचारी दोन गाडय़ांसह त्याच्या मागावर गेले. मुंबई-विरार टोल नाक्यानजीक पेट्रोल पंपावर एक पथक थांबले. त्याच वेळी अन्य पथकातील पोलीस उपनिरीक्षक संदीपान सुरवसे यांनी फैयाज गाडीने तुमच्या दिशेने येत असून आम्ही त्याचा पाठलाग करीत असल्याचे सूचित केले. गाडी टोलनाका नजीक येताच पथकातील एक गाडी त्याच्या गाडीच्या मागे लावली व दुसरी गाडी त्याच्या समोर लावत पोलिसांनी त्याला शरण येण्याचे आवाहन केले. मात्र फैयाजच्या गाडीत बसलेल्या दोन महिलांनी फैयाजला ओरडून पोलिसांनाच खतम करण्याचे सांगितले. त्याने पोलिसांच्या दिशेने बंदूक रोखून ‘ठोक दूंगा’ म्हणून पिस्टल रोखून धरली. त्याच वेळी शिरीष पवार आणि योगेश वाघमारे यांनी त्याच्या गाडीच्या टायरवर आणि हवेत अशा पाच गोळ्या झाडल्या. मात्र गाडी तशीच चालवत तो पळून गेला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला मात्र काही अंतरावर गेल्यावर तो दिसेनासा झाला. दरम्यान, पोलिसांनी रातोरात शोध घेतला असता त्याने गाडी सोडून एका खासगी गाडीचालकाला बंदुकीचा धाक दाखवून गाडी घेऊन फरार झाला. पोलिसांनी दोन महिलांना अटक केले आहे. त्यांच्यापैकी यास्मिन उस्मान शेख वय २६ ही त्याची बहीण असून यास्मिन शेख वय ६९ ही त्याची आजी आहे.
बहीणच साथीदार
फैयाज हा अट्टल गुन्हेगार असून यात त्याची बहीणच साथीदार आहे. फैयाज हा दुचाकी चालवत होता तर त्याची बहीण यास्मिन महिलांच्या गळ्यातील साखळी हिसकावून पोबारा करीत होती. साखळी चोरी केल्यानंतर काही अंतर पुढे गेल्यावर एखाद्या ठिकाणी दुचाकी पार्क करून कपडे बदलून कारमध्ये दोघेही पळून जात होते.
दुसऱ्यांदा पळाला
यापूर्वीही तो वापी येथे असल्याच्या माहितीवरून नवी मुंबई पोलिसांनी वापी गाठले होते. मात्र तेथेही त्याने फायरिंग करून पलायन केले होते. त्यामुळे आता फैयाज याला अटक करण्याचे आव्हान पोलिसांच्या समोर आले.