उरण : मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथील पर्यटकांचे एक आवडते पर्यटनस्थळ म्हणजे उरण येथील पिरवाडी बीच होय. संरक्षक बंधाऱ्यांच्या उभारणीनंतर हा किनारा पुन्हा पर्यटकांनी बहरतो आहे. सणासुदीच्या आणि सुट्टीच्या दिवसात येथे पर्यटकांची गर्दी होत आहे.
उरणचा पिरवाडी समुद्रकिनारा हा पर्यटकांना नेहमीच आकर्षित करीत आला आहे. किनाऱ्यावर पसरलेली रुपेरी वाळू आणि या रुपेरी वाळूत पायी चालण्याची मजा काही औरच असते. निसर्गरम्य वातावरण, चौफेर अथांग पसरलेला समुद्र, समुद्रकिनाऱ्यावरील लांबचलांब नजरेत पडणारी नारळी, पोफळी आणि सुरुची झाडे या नयनरम्य वातावरणामुळे ‘पिरवाडी’ पर्यटनासाठी नावारूपाला आले आहे.
मुंबईपासून अगदी जवळच असल्याने दरवर्षी येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहे. यामध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेल आणि इतर भागांतून येणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक असते. येथील समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या दग्र्यावर सर्वधर्मीय भाविकांची नेहमीच गर्दी असते.
मध्यंतरीच्या काळात उरण-पिरवाडी किनाऱ्याची मोठय़ा प्रमाणात धूप झाली होती. त्यामुळे समुद्राच्या भरतीच्या अजस्र लाटांनी संरक्षक बांधबंदिस्ती उद्ध्वस्त करून समद्राचे पाणी सागरी सीमा ओलांडून समुद्र रेषेपासून दहा ते पंधरा मीटर आत शिरायचे.
समुद्रकिनाऱ्यावरील लांबचलांब नजरेत पडणारी नारळी, पोफळी आणि सुरुची झाडे उन्मळून पडली होती. झाडांची मोठय़ा प्रमाणात पडझड झाली होती. किनाऱ्यावर असलेली स्मशानभूमीदेखील लाटांच्या तडाख्याने पार उद्ध्वस्त झाली होती.
ओएनजीसी आणि बंदर विभागाच्या माध्यमातून पिरवाडी बीचची धूप थांबविण्यासाठी कोटय़वधी रुपये खर्च करून मजबूत अशी सरंक्षक तटबंदी उभारली जात आहे. भलेमोठे दगड तटबंदीसाठी वापरण्यात येत आहेत. यामुळे किनाऱ्याची मोठय़ा प्रमाणावर होणारी धूप थांबण्यास मदत झाली आहे. किनाऱ्यावरील नारळी पोफळीच्या आणि इतर झाडांनाही तटबंदीमुळे आपोआप संरक्षण मिळाले आहे. त्यामुळे पिरवाडी बीच परिसरात निसर्गरम्य वातावरण निर्माण होण्यास मदत झाली आहे.
मागील काही वर्षांत किनाऱ्याची झालेली दुरवस्था आणि करोना साथीमुळे पिरवाडी बीचवरील पर्यटकांची संख्या रोडावली होती. मात्र, आता संरक्षक तटबंदी, नयनरम्य वातावरणामुळे पर्यटन बहरू लागले आहे. समुद्राचा आनंद लुटण्यासाठी मोटर स्पीडबोटीचीही व्यवस्था आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा