वातावरणातील बदलामुळे गारवा जाणवू लागला आहे. त्याचवेळी उरणच्या बाजारात सध्या चुलीवर शिजविलेल्या गरमागरम हिरव्या चण्या(भोड्डा)ची विक्री सुरू आहे. दर वाढले असले तरी या हिरव्या चण्याची मागणी वाढली आहे.
हेही वाचा- महाराष्ट्रात कर्नाटक भवन दिमाखात उभे; पण महाराष्ट्रात महाराष्ट्र भवनच कागदावर!
त्यासाठी उरणमधील खवय्ये वाट पाहत उभे असलेले पहायला मिळतात. दरवर्षीप्रमाणे गारवा सुरू झाल्यानंतर उरणच्या नाक्यांवर हातगाडीवर पत्र्याच्या चुलीवर मिठात भिजवून ठेवलेले चणे शिजविले जात आहेत. वाफेवर शिजलेले गरमागरम चणे खारट आणि मऊ मऊ लागतात. या चण्याची चव ही अप्रतिम लागते. त्यामुळे एक वेगळा स्वाद म्हणून या चण्यांना मागणी असल्याची माहिती चणे विक्रेत्याने दिली आहे.या चण्याचा दर हा किलोला २४० रुपये आहे. असे असले तरी खवय्यांची मागणी आहे. ५० रुपये पावकिलो असलेले चणे सध्या ६० रुपये पावकिलो झाली असली तरी ती खाण्यास चविष्ट असल्याने खरेदी करीत असल्याची माहिती पराग कडू यांनी दिली आहे.