नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेकडून मान्सूनपूर्व कामांतर्गत शहरात वृक्ष छाटणी, धोकादायक वृक्षांचे सर्वेक्षण या कामांना मे महिन्याआधीच सुरुवात होते. शहरात धोकादायक वृक्ष छाटणीला सुरुवात झाली आहे. मात्र यंदा उन्हाचा पारा ४० अंश गेल्याने पर्यावरणाच्या दृष्टीने मान्सूनपूर्व वृक्ष छाटणी उशिराने करण्यात आली असून, आता फक्त सुकलेल्या धोकादायक वृक्षांची छाटणी करण्यात येत आहे. तर उर्वरित हिरवळ झाडांची छाटणी मे महिन्याअखेर केली जाईल, अशी माहिती उद्यान विभागाने दिली.
पावसाळा सुरू झाला की शहरात झाडे उन्मळून पडण्याच्या घटना नित्याच्याच असतात. त्यासाठी महापालिका धोकादायक झाडांचे सर्वेक्षण करून मान्सूनपूर्व छाटणी केली जाते. मागील काही वर्षांपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसामुळे शहरातील जुनी झाडे उन्मळून पडत आहेत. पावसाळ्यात मोठया झाडांची पडझड होऊन मोठ्या प्रमाणावर वृक्षहानी होते. त्यामुळे महापालिका उद्यान विभागामार्फत शहरातील धोकादायक, अतिधोकादायक, तसेच वीज वाहिन्यांखालील झाडांची मान्सूनपूर्व छाटणी करण्यात येते. त्याआधी शहरातील धोकादायक वृक्ष सर्वेक्षण करण्यात येते.
हेही वाचा – नवी मुंबई : आठ वर्षांपासून एकत्र काम केले आणि क्षणिक रागापायी मित्राची केली हत्या
बेलापूर ते वाशी विभागात १२६ सुकलेली झाडे असून टप्याटप्याने छाटणी करण्यात येत आहे. यंदा तापमानात प्रचंड वाढ झाली असून पारा ४० अंशावर जात आहे. वाढत्या तापमानात हिरवळ झाडांमुळे वातावरणात वाऱ्याची झुळूक मिळत आहे. त्यामुळे सध्या हिरवेगार झाडांची छाटणी करू नका, असा आग्रह नागरिकांमधून करण्यात येत आहे. त्यामुळे वाढते तापमान परिस्थिती बघता आणि नागरिकांच्या मागणीनुसार केवळ सुकलेल्या झाडांची आणि वीज वाहिन्यांखालील झाडांची छाटणी करण्यात येत आहे.
पावसाळापूर्व शहरातील धोकादायक वृक्ष तसेच अनावश्यक वाढलेल्या फांद्यांची छाटणी करण्यात येते. मात्र यंदा उन्हाचा पारा ४० अंश गेल्याने पर्यावरणाच्या दृष्टीने सुकलेल्या झाडांची छाटणी करण्यात येत आहे. मे महिन्याअखेर हिरव्या झाडांची छाटणी करण्यात येणार आहे. – विजय कांबळे, उद्यान अधीक्षक, नवी मुंबई महापालिका