खारघरमधील वास्तुविहार सोसायटीमागील खाडीत असणाऱ्या कांदळवनाच्या हजारो झाडांची पोक्लेनच्या सहाय्याने कत्तल केल्याचे उघड झाले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या कांदळवनासमोरच रोडपाली येथील पोलीस आयुक्तालय म्हणजेच शिवाजीनगरची इमारत आहे.
बेलापूर येथील पोलीस मुख्यालयात सोमवारी मध्यरात्री एका नागरिकाने दूरध्वनी करून कांदळवनाची कत्तल सुरू असल्याची माहिती दिली. यानंतर तळोजा पोलिसांचे एक पथक काळोखात या परिसरात शिरले. पोलिसांना पाहाताच बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या कामगारांनी तेथून धूम ठोकली. उपसा केलेल्या वाळूचे मोठे ढिगारे तेथे होते. या खाडीकिनारी कांदळवनाची बेसुमार कत्तल झाल्याचे पोलिसांना दिसून आले. मात्र त्यासाठी वापरण्यात आलेले पोक्लेन बेवारस स्थितीत आढळले. पस्तीस लाख रुपये किमतीच्या या वाहनाच्या मालकाचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणी म्हात्रे बंधूंचा हात असल्याचा पोलिसांना संशय आहे, मात्र यात किती सरकारी अधिकारी गुंतले आहेत, याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे. कांदळवनाची नक्की किती कत्तल झाली, हे शोधून काढण्यासाठी पोलीस गुगल मॅपचेही सहाय्य घेत आहेत. कांदळवनाच्या हद्दीवरून वनक्षेत्र व महसूल खात्यामध्ये असलेल्या मतभेदांचा समाजकंटक नेहमीच गैरफायदा घेतात.

Story img Loader