नवी मुंबई: समाज माध्यमाद्वारे संपर्क करून ४० टक्के परतावा गुंतवणुकीचे आमिष दाखवून एका व्यक्तीची सहा लाख १३ हजारांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. फसवणूक करणाऱ्या महिलेने फायदा कसा होतो हे पटवून दिले. मात्र सुरुवातीला छोटी गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीला मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवूनही परतावा न आल्याने फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले व या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला.
देवेश जोशी असे यातील फिर्यादी यांचे नाव आहे. त्यांना ३० एप्रिल २०२२ मध्ये वाॅट्सॲपवरून आरुषी नावाच्या महिलेचा संदेश वर्से इनोव्हेशन ( Verse Innovation ) मधून आला. नंतर सदर महिलेचा फोन आला आणि त्यांनी गुंतवणुकीवर महिन्याला ४० टक्के परताव्याचे आमिष दाखवले. आमची कंपनी ऑनलाइन प्लॅटफार्मवर रिव्ह्यूज देत असते. त्याद्वारे स्थानिक बिझनेस व आंतरराष्ट्रीय कंपनीचा प्रचार केला जातो. यासाठी प्रत्येक रिव्ह्यूजकरिता १५० रुपये मिळतात. असे आरुषी नावाच्या महिलेने सांगितले आणि विश्वास बसण्यासाठी १५० रुपये फिर्यादीला टेलिग्रामद्वारा पाठवले, असेही त्या महिलेने सांगितले. त्यामुळे फिर्यादी जोशी यांचा विश्वास बसला आणि त्यांनी थोडे थोडे करीत तब्बल ६ लाख १३ हजार भरले.
हेही वाचा…. उरण: पिरवाडी बीच हाऊसफुल्ल, सुट्टीमुळे पर्यटकांची पावले समुद्र किनाऱ्यावर
हेही वाचा…. रायगड : समाजातील लुटारूपासून सावध व्हा; माजी आमदार चंद्रशेखर प्रभू यांचे प्रकल्पग्रस्तांना आवाहन
दरम्यान, दिलेले लक्ष्यही जोशी यांनी पूर्ण केले. मात्र एक रुपयाही परतावा आला नाही आणि मूळ रक्कमही गेली. हा व्यवहार ३० एप्रिल २०२२ ते ४ एप्रिल २०२३ दरम्यान झाला. याबाबत अनेकदा विचारणा करून पैसे न आल्याने शेवटी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर याबाबत जोशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.