नवी मुंबई: सुमारे सहा वर्षाच्या प्रयत्नांनी नवी मुंबईत सायबर पोलीस ठाणे उभे राहिले असून त्याचे उद्धाटन राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी पोलीस महासंचालक रजनीश सेठ आणि अप्पर पोलीस आयुक्त दीपक साकोरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. नेरुल येथील सावली इमारतीतील महिला सुरक्षा प्रकल्पाच्या उद्धाटनन वेळीच सायबर पोलीस ठाण्याचेही उद्घाटन केले जाणार आहे.
हेही वाचा >>> संचालक मंडळाच्या निर्णयाचा पेच आणखीन वाढला; एपीएमसी संचालक मंडळ बरखास्तीच्या निर्णयाला न्यायालयाची स्थगिती
नेरूळ येथील डॉ डी वाय पाटील रुग्णालय नजीक सावली इमारतीत नव्याने उभ्या केलेल्या “महिला सुरक्षा प्रकल्पाचे” उद्धाटन राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केले जाणार आहे. तसेच निर्भया या खास महिला युवतींच्या सुरक्षेसाठी कार्यान्वित केलेल्या पथकाच्या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. या शिवाय सध्या आधुनिक गुन्हेगारीत डोकेदुखी असलेल्या सायबर गुन्ह्यावर आळा बसवण्यासाठी वेगवान तपास आवश्यक आहे त्यासाठी नवी मुंबईत पहिले सायबर पोलीस ठाणेही कार्यान्वित केले जाणार आहे. मुंबईत बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये राज्यातील पहिले सायबर पोलीस ठाणे सुरु करण्यात आले आहे. त्याच वेळी नवी मुंबईतही सायबर पोलीस ठाणे सुरु करण्याच्या हालचाली करण्यात आल्या मात्र तांत्रिक अडचणी समोर येत असल्याने ते लांबत गेले. दरम्यान सायबर गुन्हेगारीतील वाढ पाहता पोलीस ठाण्याची गरज भासू लागली होती. गुन्हा घडल्या नंतर तत्काळ तपास सुरु करणे आवश्यक असते ज्याला गोल्डन हवर म्हटले जाते मात्र सायबर गुन्ह्यात होणारा तपास त्या मानाने संथ होत असल्याने गुन्हेगार सापडणे अशक्य होते. त्यामुळे केवळ सायबर गुन्हेगारीवरच काम करेल असे पथक आणि असे कार्यालयाची गरज भासत होती जी आता पूर्ण झाली आहे.