लोकसत्ता प्रतिनिधी

नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस तंत्रस्नेही व्हावे तसेच सायबर गुन्ह्याची उकल करताना ती योग्य पद्धतीने व्हावी यासाठी नवी मुंबई पोलिसांना सायबर प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे. मागील दोन महिन्यांत ३९० कर्मचाऱ्यांना सायबर सुरक्षितता आणि सायबर गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये नव्याने पोलीस दलात भरती झालेल्या कर्मचाऱ्यांचाही सामावेश होता. या प्रशिक्षणामुळे सायबर गुन्ह्यांचा शोध घेणे पोलिसांना शक्य होणार आहे.

गेल्याकाही वर्षांमध्ये मोठ्याप्रमाणात सायबर गुन्हे घडत आहेत. सायबर गुन्हेगारांकडून प्रामुख्याने सर्वसामान्य नागरिकांना लक्ष केले जात आहे. विविध माध्यमांतून सायबर गुन्हेगार नागिरकांची फसवणूक करत आहेत. हे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. फसवणूक झालेला व्यक्ती पोलीस ठाण्यात आल्यानंतर गुन्हा दाखल होतो. त्यानंतर तपासात पोलिसांच्या हाती काही लागतेच असे नाही. तपास अधिकारी, कर्मचारी तंत्रस्नेही असेल तर तपासात गती येत असते. त्यामुळे पोलीस अधिकारी, कर्मचारी तंत्रस्नेही असणे आवश्यक असते.

नवी मुंबई पोलिसांनी त्यांच्या पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना तंत्रस्नेही बनविण्याच्या दृष्टीने युनायटेड वे मुंबई आणि फेडरल एक्सप्रेस कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर सुरक्षा आणि सायबर गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण कार्यशाळा सुरू केली होती. या प्रशिक्षण वर्गामध्ये तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. ३९० कर्मचाऱ्यांना यावेळी प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रशिक्षण वर्गात काही तांत्रिक बाबींविषयी माहिती देण्यात आली. तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी तपासा दरम्यान काय करायला हवे, केंद्र सरकाच्या सायबर पोर्टरचा वापर कसा करावा, तांत्रिक विश्लेषण करताना योग्य माहिती कशी संकलित करावे अशा विविध बाबतीत कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन झाले.

डिजिटल भारताच्या सुरक्षेसाठी शासकीय यंत्रणा आणि स्वयंसेवी संस्थांसोबत एकत्रित काम करण्याची गरज आहे. ही जबाबदारी सगळ्यांची आहे. सायबर सुरक्षेत सशक्त समाज घडवण्याच्या उद्देशाने या उपक्रमाला पाठिंबा देण्यात आला आहे. -नितीन नवनीत ताटीवाला, उपाध्यक्ष, मिडल-ईस्ट, इंडियन सबकॉन्टिनेंट आणि आफ्रिका विभागाचे मार्केटिंग, एअर नेटवर्क व कस्टमर एक्सपीरियन्स.

सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करणे ही काळाची गरज आहे. सायबर गुन्ह्यांचे स्वरूप दिवसेंदिवस गुंतागुंतीचे होत चालले आहे. गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी कर्मचारी तंत्रस्नेही असणे आवश्यक आहे. त्यामुळे नव्याने पोलीस दलात भरती झालेले, तसेच इतर कर्मचाऱ्यांना हे प्रशिक्षण देण्यात आले. -संजय पाटील, उपायुक्त (मुख्यालय), नवी मुंबई पोलीस.

मुंबईतही प्रशिक्षण

मुंबईत नागरिकांसाठी मार्च महिन्यात साययबर गुन्हे विषयक प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये ५ हजार १९७ महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला होता. या उपक्रमाची सांगता करण्याच्या निमित्ताने सध्या मुंबईत पोलिसांसाठी सायबर प्रशिक्षण कार्यशाळा सुरू आहे. सायबर कक्ष, गुन्हे अन्वेषण शाखा आणि अमली पदार्थ विरोधी विभागातील अधिकाऱ्यांना ऑनलाईन फसवणूक, फिशिंग, आर्थिक सायबर धोके तपासाची दिशा ठरवताना आवश्यक असलेल्या तांत्रिक बाबी, डिजिटल माध्यमांवरील गुन्ह्याचा तपास करण्यासाठी लागणारे तांत्रिक कौशल्य याविषयी माहिती देण्यात येत आहे.