पाच महिन्यांत एक लाख १५ नागरिकांकडून वापर
पर्यावरणाचा होणारा ऱ्हास काही अंशी टाळता यावा यासाठी परदेशात विशेषत: युरोप खंडात वाहनांच्या वापरापेक्षा सायकलचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याची पुनरावृत्ती देशातील काही शहरांत सुरू झाली असून नवी मुंबई शहर या जनसायकल सहभाग योजनेत अव्वल ठरली आहे. नोव्हेंबरमध्ये सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला नवी मुंबईकरांनी चांगलाच प्रतिसाद दिला असून एक लाख १५ हजार नागरिकांनी या सार्वजनिक सायकलीचा वापर केला आहे.
यात सायकलस्वारी करणाऱ्यांची संख्या तर पावणेदोन लाखापर्यंत गेली आहे. या उपक्रमाला मिळणारा प्रतिसाद पाहता पालिकेने शहराच्या अर्ध्या भागात असलेला हा उपक्रम शहरात सर्वत्र राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सुमारे एक लाख सायकली शहरात फिरताना दिसणार आहेत.
देशातील वाहनांपासून होणारे प्रदूषण हे सर्वाधिक प्रदूषण आहे. त्यामुळे खासगी किंवा सार्वजनिक वाहनांचा वापर कमीत कमी व्हावा यासाठी अनेक यंत्रणा प्रबोधन करीत आहेत. नवी मुंबई पालिकेने वाहतूक व्हिजनअंतर्गत शहरात जनसायकल सहभाग उपक्रम राबविण्याचा निर्णय गेल्या वर्षी घेतला. पालिकेचे आयुक्त डॉ. रामास्वामी यांनी यासाठी सर्वप्रथम या सायकलीसाठी लागणारे ट्रॅक तयार करण्यावर भर दिला. त्यांची निर्मिती झाल्यानंतर बेलापूर, नेरुळ आणि वाशी या शहराच्या दक्षिण बाजूकडील भागात ही जनसायकल सहभाग योजना नोव्हेंबरमध्ये सुरू करण्यात आली.
हे काम एका खासगी संस्थेला देण्यात आले आहे. जागा उपलब्ध करून दिल्यानंतर या संस्थेने आतापर्यंत तीनशे सायकल उपलब्ध करून दिलेल्या आहेत. सहज फेरफटका मारताना समोर दिसणाऱ्या निळ्या रंगाच्या आकर्षक सायकली नागरिक घेऊ लागले आहेत. त्यासाठी ऑनलाइन व अॅप्सद्वारे आरक्षण करीत आहेत. या सायकलच्या वापरात आता सर्वच आबालवृद्धांचा सहभाग वाढला असून तो पाच महिन्यांत चक्क एक लाख १५ हजाराच्या घरात गेला आहे.
यासाठी काही शुल्क
आकारले जात आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना या सायकलने प्रवास करता येण्यासारखा आहे. त्यानंतर ही सायकल नागरिकांनी त्याच ठिकाणी असलेल्या सायकल पार्किंग झोनमध्ये सोडून दिल्यास कोणतीही हरकत नाही. नवी मुंबईतील विस्तीर्ण रस्ते आणि नव्याने निर्माण करण्यात आलेल्या सायकल ट्रॅकमुळे पालिकेच्या या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहेत.
दहावी-बारावीच्या परीक्षा संपल्या आहेत. काही दिवसांनी शालेय परीक्षादेखील संपणार आहेत. त्यानंतर या उपक्रमाला यापेक्षा जास्त प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
बहुमजली पार्किंगची गरज
शहर जास्तीत जास्त पर्यावरणशील राहावे यासाठी पालिकेचा प्रयत्न आहे. यामुळे नागरिकांना प्रदूषणमुक्त, सुरक्षित, सुखदायी आणि सोयीस्कर वाहतूक पर्याय निर्माण केले जात आहे. यात वाशी ते कोपरखैरणेपर्यंत रोप वे चा एक पर्याय मध्यंतरी सुचविण्यात आला होता पण तो सध्या अडगळीत पडला आहे. वाहनतळ ही शहरातील एक बिकट समस्या निर्माण झाली असून त्यासाठी बहुमजली पार्किंग इमारती उभारण्याशिवाय पालिकेला दुसरा पर्याय राहणार नाही. याला जनसायकल सहभागसारखे उपक्रम पूरक ठरणार आहेत.
पालिकेच्या जनसायकल सहभागप्रणालीला चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत एक लाख १५ हजार नागरिकांनी यात सहभाग घेतला आहे. नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता यानंतर ही योजना संपूर्ण शहरात कार्यान्वित केली जाणार असून यासाठी एक लाख सायकलींचे लक्ष ठेवण्यात आले आहे.
-दादासाहेब चाबुकस्वार, उपायुक्त, नवी मुंबई पालिका