लोकसत्ता टीम,
नवी मुंबई: शाश्वती भोसले (३२ वर्षे) पहिल्यांदा ईशान्य भारतात सायकलिंगला गेली तेव्हा ती कोणीतरी सेलिब्रिटी असल्यासारखी गर्दी तिच्याभोवती झाली होती आणि एका लहान मुलीने तिची सही मागितली होती. शाश्वतीसाठी ही अतिशय नवीन गोष्ट होती. तिने मुलीला सांगितले की, ती चित्रपटातील नायिका नाही. त्यावर ती लहान मुलगी म्हणाली, “तू इथे सायकलवर आली आहेस. आमच्यासाठी तूच सेलिब्रिटी आणि आमचं प्रेरणास्थान आहेस.” मूळ मराठवाड्यातील आणि पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या शाश्वतीने नवी मुंबईतील बेलापूर येथील ‘ॲग्रो गार्डन’मध्ये आयोजित केलेल्या ‘सायकल कट्टा’ या सायकलप्रेमींच्या अनौपचारिक मंचावर आपल्या सायकल प्रवासाचे अनुभव सर्वांसमोर मांडले.
सात वर्षे काम केल्यानंतर कामापासून विश्रांती घ्यायची म्हणून २०१९ मध्ये ईशान्य भारतात सायकलिंग करण्याचा निर्णय शाश्वतीने घेतला. ती एकटीच बाहेर पडली. त्रिपुरापासून सुरुवात करून, नंतर मिझोराम, आसाममध्ये प्रवास करत वाटेत म्यानमारमध्येही छोटासा सायकलप्रवास केला. दक्षिणेला अंदमानमध्येही सायकलिंग केलं, पश्चिम भारतात पुणे ते गोव्यापर्यंतचा सायकलप्रवास केला.
आणखी वाचा- नवी मुंबई महापालिका मालामाल, यंदा ६३३.१७ कोटी रक्कमेची विक्रमी वसुली
एक महिला आणि आणि एकटीने सायकल प्रवास करताना तुला भीती वाटली नाही का?, या प्रश्नाचे उत्तर देताना शाश्वती म्हणाली की, तिला हा प्रश्न अनेकदा विचारला गेला आहे. “आता मला या प्रश्नाचीच भीती वाटते. मला कधीच विशेष वाईट अनुभव आला नाही. आणि माझा अनुभव आहे की जेव्हा तुम्ही सायकलवर असता, धडपड करता तेव्हा लोकांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. त्यामुळे तुमच्याबद्दल आदर निर्माण होतो.” सायकल चालवताना मी कधीही कोणतेही लक्ष्य ठेवत नाही, प्रवासाच्या नोंदीही करण्यात वेळ वाया घालवत नाही कारण त्यामुळे तुम्ही त्यावेळचे आनंदी क्षण गमावता, असंही ती म्हणाली. हाच फरक व्यवसाय आणि छंदामध्ये आहे. छंद जोपासताना कोणतेही लक्ष्य नसते, म्हणूनच त्यातून जास्तीत जास्त आनंद मिळतो, असं तिला वाटतं.
सायकलिंगने पर्यटन व्यावसायिकांना काही वेगळ्या गोष्टी शिकवल्या: उदा. फ्रेंच किंवा जर्मन ऐवजी भारतीय भाषांचे कौतुक करणे. ती आता बंगाली, आसामी भाषा शिकतेय. टागोरांच्या कविता कळतील एवढी बंगाली तिला आता कळते. त्याचाच आधार घेत सायकल कट्टयाचा समारोप करताना शाश्वती म्हणते, ‘तुम्हाला जितका जास्त त्रास होईल त्यातून तुम्हाला तितकी अधिक प्रेरणा मिळेल.’