नवी मुंबई: मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या वाशी खाडीपुलावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सध्या सुरू असलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूला दोन नवे खाडी पूल तयार होत असून यांचे काम प्रगतीपथावर आहे. नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी नव्याने होत असलेल्या एका पुलाचे काम मे २०२४ पर्यंत पूर्ण करण्यात येईल व मुंबईकडे जाणारा खाडी पूल सप्टेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी वाशी येथे दिले.
नवी मुंबई व मुंबईला जोडणारा पहिला खाडी पूल १९७१ मध्ये तयार करण्यात आला होता. त्यानंतर याच वाशी खाडी पुलावर दुसरा खाडी पूल १९९५ मध्ये सुरू करण्यात आला आहे. तर आता मोठ्या प्रमाणात वाढलेली वाहनांची संख्या यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी होत असून नव्याने तयार करण्यात आलेले पूल लवकरात लवकर बांधून पूर्ण करण्यात येतील. यातील एक पूल मे २०२४ व नवी मुंबईकडून मुंबईकडे जाणारा तिसरा खाडी पूल २०२४ पर्यंत पूर्ण करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल.
हेही वाचा… उरणमध्ये श्रावण सरी; क्षणात पाऊस, क्षणात ऊन
नव्या होणाऱ्या तिसऱ्या खाडी पुलावरून नागरिकांना अधिकची सुविधा उपलब्ध होणार असून वेगाने काम सुरू असल्याची माहिती भुसे यांनी आज वाशी खाडी पुलावरील सुरू असलेल्या कामाच्या पाहणीदरम्यान दिली.