यंदाचा दहीहंडी उत्सव उत्साहात होण्याचे चिन्ह असून शहरात पन्नासपेक्षा अधिक ठिकाणी दहीहंडीसाठी परवानगी अर्ज आले आहेत. दरम्यान, हा उत्सव रात्री दहा वाजेपर्यंत उरकण्यासंदर्भात मंडळांना पोलीस विभागाकडून सूचित करण्यात आलेले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबईत दहीहंडी उत्सव उत्साहात होण्याची चिन्हे आहेत, त्या अनुषंगाने पोलिसांनीही सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला आहे. विशेष म्हणजे वाहतूक शाखेनेही कुठेही वाहतुकीस अडथळा येऊ नये म्हणून काळजी घेतली असून कुठल्याही ठिकाणी वाहतूक वळवण्यात येणार नाही मात्र फारच गर्दी वा वाहतूक कोंडी होत असेल तर पर्यायी मार्गांचे नियोजन करण्यात आलेले आहे.

नवी मुंबईत आतापर्यंत सुमारे ५० आयोजक मंडळांनी पोलीस विभागात अर्ज केलेले आहेत. या सर्वांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे वाशीतील माजी नगरसेवक अविनाश लाड आयोजित दहीहंडी उत्सव यंदा रद्द करण्यात आला असल्याने वाशीत होणारी गर्दी यंदा पाहावयास मिळणार नाही, तसेच कोपरखैराणेतील वन वैभव कला क्रीडा समितीतर्फे आयोजित होणारा उत्सवही रद्द करण्यात आल्याने कोपरखैराणेतील पोलीस यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे. माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले व स्व. सुनील चौगुले स्पोर्ट क्लब आयोजित दहीहंडी उत्सव यंदा दणक्यात होणार असून मंडळांना आकर्षित करण्यासाठी ११ लाख ११ हजार १११ प्रथम बक्षीस घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे नवी मुंबईत सर्वाधिक गर्दी सेक्टर १४ ते १६ ऐरोली येथे होणार असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या उत्सवाला होणाऱ्या गर्दीने नवी मुंबईतून ऐरोली मार्गे मुलुंड, भांडुप, ठाणे, अंधेरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ शकते हे पाहता या ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्याचप्रमाणे शहरात मुंबई, ठाणेकडून येणारे गोविंदा पथकांच्या गाड्या या ट्रक असतात, हा विचार करता त्यांना अडचण आणि कोंडी नाही याचीही काळजी घेण्यात येणार आहे.

शहरात सर्वत्र चोख बंदोबस्त शुक्रवार दुपारनंतर येणार आहे लावण्यात येणार आहे. यात संध्याकाळी यात वाढ करून सुमारे बाराशे पोलीस कर्मचारी दहा वरिष्ठ पोलीस निरीक्षक असणर असून महिला पोलीसही असणार आहेत. गरज पडल्यास दंगल विरोधी पथकालाही पाचारण करण्यात येईल. उत्सव अवश्य करा मात्र कायद्याला अनुसरून करा असे आवाहन आम्ही केलेले आहे.

– विवेक पानसरे, पोलीस उपायुक्त

शहरात कोठेही रस्ता बंद राहणार नाही. अत्यावश्यक ठिकाणी वाहने तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी रस्त्यावर वळवण्यात येतील. नागरिकांनीही वाहतूक नियमांचे पालक करावे. जेणेकरून सर्वच ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यात आम्हाला यश मिळेल.

पुरुषोत्तम कराड</strong>, उपायुक्त वाहतूक शाखा