नवी मुंबई : मागील दोन वर्षांपासून करोनामुळे दहीहंडी उत्सवाची घागर उतानीच पाहायला मिळाली. परंतु आता करोनाची स्थिती अत्यंत नियंत्रणात असून निर्बंधमुक्तीमुळे नवी मुंबईतही उत्साह पाहायला मिळणार आहे. सीवूड्स, सानपाडा, ऐरोली या विभागासह शहराच्या विविध उपनगरात हा उत्सव आनंदाने साजरा केला जाणार असल्याचे चित्र आहे.
नवी मुंबई शहरात दहीहंडी उत्सवाची परंपरा आहे. दहीहंडी उत्सवाच्या अगोदर चोरहंडी उत्सवही साजरा केला जातो. या चोरहंडी उत्सवाचे आयोजन जुईनगर विभागात करण्यात आले होते. त्यालाही मोठा प्रतिसाद मिळाला होता. सीवूड्स रेल्वेस्थानक पूर्व परिसरात जनकल्याण मित्र मंडळ तसेच भाजप युवा मार्चाच्या संय़ुक्त विद्यमाने दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार आहे. तसेच सानपाडा विभागात भाजपचे पांडुरंग आमले यांच्यावतीने सानपाडा सेक्टर ८ येथील हुतात्मा बाबू गेणू मैदान येथे सोन्याच्या हंडीचे आयोजन करण्यात आले आहे. तर ऐरोली विभागात शिंदे गटाचे विजय चौगुले यांच्यावतीने सुनील चौगुले स्पोर्टस यांच्या आयोजनातून ऐरोली सेक्टर १५ येथे भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे इतर विभागातही दहीहंड्यांची तयारी सुरू असून शहरात पुन्हा एकदा दहीहंडीचा उत्साह दिसत आहे.
या दहीहंडी उत्सवात काहींनी सामाजिक उपक्रमही राबवले असून पर्यावरणपूरक सायकलींचे वापटही करण्यात येणार आहे.
सानपाडा येथील भाजपचे पांडुरंग आमले यांनी सांगितले की, यावेळी सोन्याच्या हंडीचे आयोजन करण्यात आले असून दहीहंडी फोडणाऱ्याला सोन्याचा मुलामा दिलेली दहीहंडी दिली जाणार आहे. सलामी देणाऱ्या पथकांनाही आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहे. तसेच पाच अपंग मुलांना सायकली भेट देऊन त्यांचे पालकत्व स्वीकारले जाणार आहे. भाजपचे रविंद्र इथापे यांनी सांगितले की, करोनानंतर प्रथमच सीवूड्स रेल्वेस्थानक पूर्व विभागात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार आहे. एकंदरीतच शहरातील विविध विभागात करोनानंतर प्रथमच दहीहंड्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच गोविंदा पथकांनीही जोरदार सरावाला अनेक दिवसापासून तयारी सुरू केली असल्याचे चित्र आहे.
करोनानंतर पुन्हा एकदा उत्साहाने ऐरोली सेक्टर १५ येथे दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. एकूण ११ लाखांची बक्षिसे दिली जाणार आहेत.
विजय चौगुले, शिंदे गट
दोन वर्ष करोनामुळे दहीहंडी उत्सव झाले नाहीत. परंतु पुन्हा एकदा गोविंदापथकाची तयारी सुरू आहे. यावर्षी आम्ही कार्ला येथे एकवीरा देवी समोर हंडी रचून सरावाला सुरुवात केली आहे. आमच्या पथकात २१३ गोविंदा सहभागी आहेत.
देवनाथ म्हात्रे, अध्यक्ष, एकवीरा कला क्रीडा मंडळ, गोविंदापथक