न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत
न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार रविवारी उरणमधील पोलिसांनी रस्त्यावर उभारण्यात येणाऱ्या दहीहंडय़ांना बंदी घातली होती. त्यामुळे दरवर्षी भररस्त्यात विविध राजकीय पक्षांच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या दहीहंडय़ा यावर्षी रद्द करण्यात आल्या होत्या.  न्यायालयाच्या निर्णयामुळे अनेक राजकीय पक्षांची प्रचाराची घागर उताणी पडल्याचे यावेळी दिसून आले. उरणकरांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करून त्याचे पालन करण्याचे प्रयत्न करणाऱ्या पोलिसांचेही कौतुक केले आहे.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विविध पक्ष तसेच सामाजिक संस्थांनी शहरातील रस्त्यांवर दहीहंडय़ा उभारण्याची तयारी सुरू केलेली होती. रस्त्यात नागरिकांना अडथळा निर्माण होईल अशा ठिकाणी दहीहंडी न उभारता ती मैदानात उभारण्यात यावी, डिजेचा आवाज तसेच थरांची व हंडीच्या उंचीची मर्यादा याबाबत कडक र्निबध घालण्यात आले होते. उत्सव मंडळींना या सूचनांचे पालन करणे अशक्य असल्याचे दिसल्यावर अनेक ठिकाणी दहीहंडय़ा रद्द करण्यात आल्या.
या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्रशांत पाटील यांनी उरण पोलिसांना सरकारी अनागोंदी आणि दुष्काळाचे कारण देत दहीहंडी रद्द करीत असल्याचे पत्र दिले होते. त्याप्रमाणे इतर राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनीही विविध कारणे देत दहीहंडी रद्द करण्याचे सांगितले आहे.
उरण नगरपालिकेने दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते. थराला पारितोषिक देत गोविंदा पथकांना यावेळी प्रोत्साहन देण्यात आले. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी प्रयत्न करून दहीहंडी सण शांततेत पार पाडण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र गलांडे यांनी दिली. उरण शहरात शांततेत व उत्साहात दहीहंडीचा सण साजरा झाल्याने उरणमधील अनेक नागरिकांनी विशेषता महिलांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले.
वाशी येथे रुग्णवाहिकेची तोडफोड
दहीहंडीचा उत्सव सुरू असताना ठाणे-बेलापूर मार्गावर झालेल्या अपघतात अंकुश कांबळे यांचा मृत्यू झाला. ते गोंविदा पथकासमवेत खरण्याजवळ आले असताना हा अपघात झाला. पालिका रुग्णालयात वेळीच उपचार न मिळाल्याने कांबळे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत गोविंदा पथकातील तरुणांनी रुग्णालयाच्या आवारात तोडफोड केली. रुग्णवाहिकेच्या काचा फोडत चालकांसह कर्मचाऱ्यांना जमावाने बेदम मारहाण केली. या रुग्णालयात सुमारे १२ जखमी गोंविदा दाखल असताना पुरेशा डॉक्टरअभावी रुग्णांचे अतोनात हाल होत आल्याचे निर्दशनास आले. या घटनेची माहिती मिळताच विरोधी पक्षनेते विजय चौगुले, नगरसेवक प्रशांत पाटील, ज्ञानेश्वर भोईर, विलास भोईर यांनी घटनास्थळी भेट घेऊन रुग्णालयाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.
चार गोविंदा जखमी, गावठी दारू जप्त
पनवेल तालुक्यामध्ये चार गोविंदा जखमी झाले. त्यामध्ये एक जण मद्यपी होता. कामोठे येथील धाया गोवारी यांनी परवानगी न घेता दहीहंडी उभारल्याने त्यांच्यावर पोलिसांनी प्रतिबंधनात्मक कारवाई झाली. गोवारी यांच्या घरावर रात्री १० वाजता सहायक पोलीस आयुक्त शेषराव सूर्यवंशी यांच्या पथकाने धाड टाकून २३ लिटर गावठी दारू विकताना गोवारी दाम्पत्याला अटक केली. यासाठी कामोठे पोलिसांचे सहकार्य घेण्यात आले. गोवारी हे फेरीवाला संघटनेचे अध्यक्ष आहेत. तसेच ते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा