अलीकडे गणपती उत्सव असो की नवरात्रोत्सव असो फक्त त्या त्या परिसरातील बच्चेकंपनीच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न होतो. मात्र शास्त्रीय नृत्य व गायनाचे कार्यक्रम मोठय़ा प्रमाणावर केले जात नाहीत, असे आढळते. मात्र, घणसोली आणि वाशी येथे अनुक्रमे शनिवारी आणि रविवारी नवरात्रोत्सवानिमित्त ‘डान्स एन्सेम्बल’ या शास्त्रीय नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कोपरखैरणे येथील नटनप्रिया अ‍ॅकॅडमी ऑफ डान्स अ‍ॅण्ड म्युझिक अर्थात ‘नादम’ या संस्थेतर्फे शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता घणसोली येथील देवी मुकाम्बिका देवालय नवरात्रोत्सवात भरतनाटय़म तसेच अन्य शास्त्रीय नृत्याचा कार्यक्रम सादर होणार आहे. ‘नादम’ संस्थेच्या संचालिका विद्या वेंकटेश्वरन आणि त्यांच्या विद्यार्थिनी यात सहभागी होणार आहेत. रविवार, १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता ‘डान्स एन्सेम्बल’ कार्यक्रमाचा दुसरा प्रयोग वाशीच्या सेक्टर २९ मधील वैकुंदम गुरूवायूर श्रीकृष्ण मंदिराच्या कौस्तुभम सभागृहात सादर केला जाणार आहे. शास्त्रीय गायन आणि शास्त्रीय नृत्याविष्कार अनुभवण्याची संधी नवी मुंबईकरांना मिळणार आहे. अधिक माहितीसाठी २७५४१९५७ या क्रमांकावर संपर्क साधावा.