ना फलक ना रंग; शहर अभियंता विभागाकडे माहितीच नाही
नवी मुंबई : शहरात नव्याने बनवण्यात आलेल्या एकाही गतिरोधकाला रंग देण्यात आलेला नाही. मुख्य रस्ता असो वा अंतर्गत बहुतांश ठिकाणी गतिरोधक असल्याच्या पाटय़ाही नाहीत, त्यामुळे अपघात कमी होण्याऐवजी रोज छोटे-मोठे अपघात होत आहेत. धक्कादायक बाब अशी की, शहरात न्यायालयाच्या आदेशाने काढून टाकण्यात आलेले गतिरोधक किती आणि नव्याने बसवण्यात आलेले किती? एकूण गतिरोधक किती? याची माहितीच शहर अभियंता विभागाकडे उपलब्ध नाही.
शहरांतर्गत अनेक ठिकाणी गतिरोधक बनवण्यात आले होते. यातील अनेक गतिरोधक नियमबाह्य़ असल्याने न्यायालयाच्या आदेशाने राज्यात नव्याने बऱ्याच ठिकाणी असे गतिरोधक काढून टाकण्यात आले. नवी मुंबईतीलही असे गतिरोधक काढून टाकण्यात आले. मात्र त्यानंतर शाळा, महाविद्यालय, रुग्णालय परिसरांत नव्याने गतिरोधक बनवण्यात आले.
याशिवाय पावसाळ्यात खराब झालेले रस्ते पुन्हा चांगले बनवताना अनेक ठिकाणी नव्याने गतिरोधक टाकण्यात आले. मात्र याची नेमकी संख्या शहर अभियंता विभागाकडे उपलब्ध नाही.
विशेष म्हणजे नियमानुसार ज्या ठिकाणी गतिरोधक आहे, त्या ठिकाणी उजव्या वा डाव्या बाजूला ‘येथे गतिरोधक आहे’ असा फलक लावणे अनिवार्य आहे. तसेच वाहनचालकांना गतिरोधक ओळखू येण्यासाठी त्यावर झेब्रा क्रॉसिंगप्रमाणे पट्टेरी रंग देणेही बंधनकारक आहे. असे असताना नवी मुंबईत या नियमांचा विसर पडलेला दिसतो. विशेष म्हणजे गतिरोधक बनताच त्याला रंग देण्याचे आदेश शहर अभियंता विभागाकडून देण्यात आलेले आहेत, मात्र खरेच रंग दिलेला आहे की नाही याबाबत हा विभाग अनभिज्ञ आहे.
अचानक गतिरोधक दिसल्याने वाहनचालक ब्रेक लावतात. मात्र मागून येणाऱ्या वाहनचालकाला हे लक्षात न आल्याने मागून धडक बसते. यात दोन्ही वाहनचालकांत वाद झाडतात. यात वाहतूक कोंडी झाल्याच्या अनेक घटना घडत आहेत. गतिरोधक बनवताना अनेक ठिकाणी काम उरकल्याप्रमाणे ते बनविण्यात आले आहेत.
शहर अभियंता विभागाकडे माहिती नाही
याबाबत शहर अभियंता मोहन डगावकर यांना विचारले असता, माझ्याकडे माहिती नाही. तुम्ही शुभांगी दोडे यांच्याकडे बहुधा माहिती असल्याचे सांगण्यात आले. दोडे यांच्याशी संपर्क केला असता, माझा मोबाइल कधीही बंद पडू शकतो, असे सांगताच मोबाइल बंद झाला. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
काही वर्षांपूर्वी न्यायालयाच्या आदेशाने अनेक गतिरोधक काढण्यात आले, तर अनेक ठिकाणी नवीन बसवण्यात आले. मात्र त्यांची संख्या सांगता येणार नाही. गतिरोधक बनविल्यानंतर रंगही देण्याचे आदेश देण्यात आले होते. याबाबत माहिती घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल.
– मोहन डगावकर, शहर अभियंता