उरण : नवघर ते खोपटा पूल मार्गावरील पथदिव्याखाली अंधार पसरला आहे. जेएनपीटी बंदरावर आधारित गोदाम तसेच उरणच्या पूर्व आणि पश्चिम विभाग ये-जा करणाऱ्या वाहनांना त्रास सहन करावा लागत आहे. या सार्वजनिक प्रवासी वाहतुकीच्या रहदारीचा रस्ता अंधारात गेल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नवघर ते खोपटा हा मार्ग सिडकोने विकसित केला आहे. त्याच्या दुरुस्ती, वीज याची जबाबदारी सिडकोकडे आहे. मात्र या मार्गावर सध्या अंधार पसरला असून वाहनांना अंधारातून वाट काढावी लागत आहे. या मार्गावरील जड कंटेनर वाहन व प्रवासी वाहने एकाच वेळी ये-जा करीत असतात. त्याचवेळी शेजारील गोदमातून वाहने येतात. त्यामुळे येथील वळणावर अपघाताची शक्यता आहे. सिडकोने लवकरात लवकर या मार्गावरील पथदिवे सुरू करावेत अशी मागणी येथील वाहन चालक व प्रवाशांकडून केली जात आहे.