नवी मुंबई : शिवसेना कोणाची याच शक्तीप्रदर्शन करण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा शिवाजी पार्कला तर शिंदे गटाचा बीकेसी येथे दसरा मेळावा होणार असून त्यासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून शिवसैनिक मुंबईकडे निघाले असताना नवी मुंबईतून शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी जाणाऱ्या शिवसैनिकांनी रेल्वे मार्गे जाण्याचा निश्चय केला आहे.तर शिंदे गटाच्या बीकेसीतील मेळाव्यासाठी नवी मुंबईतून तब्बल २०० बस रवाना झाल्याची माहिती शिंदे गटाने दिली आहे.शिवसेनेत उभी फूट पडल्यापासून नवी मुंबईतही शिवसेनेमध्ये दोन गट पडले असून अनेकांनी शिंदे गटाचा तर अनेकांनी उध्दव ठाकरे यांच्या मूळ शिवसेनेसोबत राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर स्थानिक पातळीवरही दोन गट आपली ताकद दाखवण्यासाठी सज्ज झाल्याचे चित्र आहे.
नवी मुंबईतून उध्दव ठाकरे यांचे समर्थक असलेले शिवसैनिक हे रेल्वेमार्गाने प्रवास करत असून बेलापूर नेरुळ,सीवूडस,सानपाडा व वाशी येथील शिवसैनिक वाशी कुर्ला मार्गे दादरला जाणार आहेत. तर तुर्भे, कोपरखैरणे, ऐरोली ,घणसोली या भागातील शिवसैनिक हे ट्रान्स हार्बर मार्गे ठाणा येथुन शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वात शिवाजी पार्कला जाणार आहेत. एकीकडे शिवाजी पार्कला जाणाऱ्यांनी तयारी केली असून दुसरीकडे शिंदे गटाचे शिवसैनिक हे बसमार्गे बीकेसी कुर्ला येथे पोहचणार आहेत. शिवाजी पार्कला जाण्यासाठी शिवसैनिक हे ४ नंतर नवी मुंबईतून रेल्वेमार्गे प्रवास करणार आहेत अशी माहिती शिवसेनेचे विठ्ठल मोरे यांनी लोकसत्ताला दिली.
बीकेसी येथे जाण्यासाठी ऐरोली व दिघा येथुन १६० बस तर इतर उपनगरातून ४० बस अशा २०० बसमध्ये शिवसैनिक रवाना होत आहेत. -विजय चौगुले ,शिंदे गट
बाळासाहेबांची शिवसेना अखंड राहणार असून आता उद्धव साहेबांना आमच्या मूळ शिवसैनिकांची गरज आहे. गद्दार हे बाहेर पडले आहेत. पायाला जखम झाली आहे. पण काही झाले तरी शिवाजी पार्कला जाणारच आहे. -विश्वनाथ शिंदे, शिवसैनिक वय ६५
बाहेरगावावरुन शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी आलेल्यांची नाष्टा पाण्याची सुविधा वाशी येथील सिडको प्रदर्शनी केंद्र येथे विजय चौगुले यांनी केली होती.