जगदीश तांडेल, लोकसत्ता
उरण : तालुक्यातील पूर्व व पश्चिम या दोन्ही विभागांना जोडणाऱ्या पारंपरिक खोपटे ते चिरनेर मार्गे दास्तान या १३ किलोमीटर अंतरच्या मार्गाचे सार्वजनिक बांधकाम विभाकडून रुंदीकरणासह काँक्रीकरण करण्यात येणार आहे. या मार्गाचे दुभाजकाने चौपदरीकरण करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे. यासाठी ३१५ कोटीचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे मार्गावरील अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे सातत्याने रस्त्याला होणारे खड्डे आणि वाहतूक कोंडीची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.
१९९३- ९४ पर्यंत उरण तालुका हा खोपटे खाडीमुळे दोन भागात विभागला होता. त्यामुळे अवघ्या अर्धा किलोमीटर पेक्षाही कमी अंतर असलेल्या खाडीमुळे खोपटे येथील नागरिकांना १३ किलोमीटर चे अंतर पार करून यावे लागत होते. मात्र १९९३ मध्ये हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या पुलावरील वाहतूक वाढल्याने पर्याय म्हणून आणखी एका नव्या पुलाची उभारणी करण्यात आली आहे. या दोन खाडीपुलामुळे येथील खोपटे, कोप्रोली, पिरकोन, सारडे, मोठीजुई, कळबूसरे आदी गावात जेएनपीटी बंदरावर आधारित कंटनेर गोदाम उभे राहिले आहेत. या जड वाहनानांच्या वाढत्या संख्येमुळे डांबरीकरण करण्यात आलेले रस्ते वारंवार खराब होऊन खड्डेमय बनले आहेत. या खड्ड्यामुळे या मार्गावर परिसरातील नागरिकांना व प्रवाशांना सातत्याने वाहतूक कोंडीचा व अपघाताचा सामना करावा लागत आहे. तर खड्ड्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.
आणखी वाचा-७ लाखांचा एमडी अंमली पदार्थ एपीएमसी पोलिसांकडून जप्त, दोघांना अटक
जड वाहनांमुळे दोन्ही खोपटे खाडीपूलावर प्रचंड खड्डे पडले आहेत. तर उरण-पनवेल मार्गाला जोडणाऱ्या दास्तान ते दिघोडे या मार्गाला ही मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. येथील दिघोडे नाका हा या परिसरातील वाहतूक कोंडीचे ठिकाण बनले आहे. या विभागात ही कंटनेरची गोदाम उभी करण्यात आली आहेत. त्यामुळे या मार्गाच्या रुंदीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रस्ताव तयार केला होता.
खोपटे,चिरनेर मार्गे दास्तान या रस्त्याचे काँक्रीकरण करण्यात येणार आहे. या मार्गाच्या कामाला मंजुरी मिळाली असून खोपटे पूल ते दास्ताना या मार्गाच्या कामाला सुरूवात करण्यात येणार असल्याची माहिती उरणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त अभियंता नरेश पवार यांनी दिली आहे.
दुभाजकामुळे चौपदरी मार्ग
दिघोडे ते चिरनेर पासून कोप्रोली पर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आलेले आहे. मात्र या वेगवान झालेल्या मार्गाला दुभाजक नसल्याने अपघात वाढले होते. मात्र नवीन प्रस्तावात दुभाजक असल्याने अपघाताच्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे.