ठाणे : सायबर गुन्हेगार आपल्यापेक्षा पुढे आहेत. कारण त्यांच्याकडे अत्याधुनिक साधने आहेत, अशा गुन्हेगारांना नैतिकतेशी काहीही देणे-घेणे नाही. त्यांच्याविरोधात आपल्याला लढायचे आहे असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबई येथे पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प हा आमच्या स्वप्नातील प्रकल्प होता. जेवढी अर्थव्यवस्था वेगवान, डिजीटायझेशन होते. त्यासोबतच या क्षेत्रातील आव्हाने तितक्याच प्रमाणात वाढत जातात. आपण जर सजग राहिलो नाही. तर अनेकांची यामध्ये फसवणूक होऊ शकते. दुर्दैवाने सायबर गुन्हेगार आपल्यापेक्षा पुढे आहेत. कारण, त्यांच्याकडे अत्याधुनिक साधने आहेत, अशा गुन्हेगारांना नैतिकतेशी काहीही देणे-घेणे नाही असे फडणवीस म्हणाले. पूर्वी कायदा आणि सुरक्षेच्यावेळी खोटे कथानक तयार करून ते समाजमाध्यमांवर पसरवून दंगली घडविल्या जात होत्या. आम्ही ते तपासायला पाठविल्यानंतर तेथून माहिती येण्यासाठी किंवा तो संदेश थांबविण्यासाठी दोन ते तीन दिवस जात होते. तो पर्यंत येथे दंगली घडलेल्या असायच्या. त्यामुळे एक परिपूर्ण उपाय उभा करणे आवश्यक होते. त्यानुसार हे केंद्र सुरू करण्यासाठी पावले उचलल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

हेही वाचा >>> Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळावर उतरलं पहिलं विमान! धावपट्टीची चाचणी यशस्वी; नियमित वाहतूक कधी सुरू होणार?

पूर्वी आपण आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेची स्थापन केली. त्यावेळी हा विभाग अडगळीतला असल्याचे म्हटले जात होते. पण आता हाच विभाग सर्वांत महत्त्वाचा विभाग ठरत आहे. आता सायबर गुन्हे शोध कक्ष हे महत्त्वाचे कक्ष ठरत आहे. महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पासाठी २०१८ मध्ये प्रयत्न सुरू केले होते. परंतु २०१९ मध्ये आमचे सरकार गेले आणि हा प्रकल्प कपाटबंद झाला. पुन्हा आम्ही सरकारमध्ये आलो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात सरकारमध्ये पुन्हा गृहमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे या प्रकल्पाला पुन्हा पुढे नेण्याचे काम सुरू झाले असेही फडणवीस म्हणाले. दरवर्षी नव-नवे तंत्रज्ञान येत असते. त्यामुळे तंत्रज्ञान हाताळणारे या क्षेत्रातील तज्ज्ञ तितकेच गतीमान असायला हवे. त्यामुळे या केंद्रात दरवर्षी पाच हजार जणांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. हा प्रकल्प केवळ प्रकल्प राहता कामा नये. इतर राज्यानांही या माध्यमातून सायबर सुरक्षा बाबतचे मार्गदर्शन केले जावे असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. १४४०७ हा मदत क्रमांक देखील सुरू करण्यात आला असून १५ ऑक्टोबरपासून या केंद्रातील सर्व कामे पूर्ण सुरू होतील असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>> पावती न देता दंडवसुली करणाऱ्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा

१५ मिनीटांत पोलिसांनी त्या व्यक्तीचा शोध घेतला चार दिवसांपूर्वी एका वरिष्ठ नेत्याने मला संपर्क साधला होता. त्यांनी मला सांगितले की, ‘मला ‘सीबीआय’मधून संपर्क साधला जात आहे. माझे पाकिस्तानसोबत संबंध असल्याचे ते म्हणत होते. तसेच त्यांनी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.’ मी त्यांना सांगितले ही फसवणूक आहे. तसेच, त्यांना मुंबई पोलिसांकडे तक्रार देण्यास सांगितली. मी देखील मुंबई पोलिसांना याबाबत सांगितल्यानंतर १५ मिनीटांत पोलिसांनी त्या व्यक्तीचा शोध घेतला. वरिष्ठ नेत्यांना देखील अशा गोष्टींवर विश्वास बसू शकतो. तर सर्वसामान्यांचे काय? असा किस्साही फडणवीस यांनी सांगितला.