उरण: जगप्रसिद्ध घारापुरी बेटाच्या किनाऱ्यावर ३० फूट लांबीचा संरक्षित मृत ब्लु व्हेल जातीचा मासा आढळून आला असून वनविभागाने या माशाची नोंद केली आहे. स्थानिक बोटींच्या सहाय्याने मुंबई-बेलापूर समुद्र प्रवाहात सोडल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी एन. एम. कोकरे यांनी दिली. मंगळवारी सायंकाळी घारापुरी बेटाच्या प्रावासी जेट्टीच्या बाजूला एक महाकाय मासा मृत असल्याचे आढळून आले असता, घारापुरीचे सरपंच बळीराम ठाकूर यांनी याची माहिती पोलीस ठाणे तसेच वनविभागाला दिली. या जेट्टीवरून हजारो पर्यटक ये-जा करत असतात, या पर्यटकांमध्ये कोणताही गोंधळ होऊ नये तसेच कुजलेल्या अवस्थेमधील या माशामुळे रोगाची लागण होऊ नये यासाठी हा मासा येथून तात्काळ हलवणे किंवा त्याची विल्हेवाट लावणे गरजेचे होते. वनपरिक्षेत्र अधिकारी एन.एम.कोकरे यांनी माशाची पाहणी करून हा मासा ब्लु व्हेल प्रजातीमधील असून, त्याची लांबी ३० फूट तर वजन ७ ते ८ टन असल्याचे सांगितले. तर या माशाला बोटींच्या साहाय्याने मुंबई- बेलापूर समुद्री प्रवाहात सोडला असल्याचेही सांगितले आहे.
ब्लु व्हेल या माशाची प्रजाती ही नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने ही प्रजाती जागतिक स्थरावर संरक्षित आहे. यामुळे हा मासा प्रथम श्रेणीमध्ये मोडला जातो. अशा प्रकारे मासा आढळल्यास त्याची विल्हेवाट लावण्याची जवाबदारी ही वनखात्याची असते. घारापुरी येथे आढळलेल्या माशाला वनविभागाने जाळून किंवा पुरून विल्हेवाट न लावताच पुन्हा समुद्राच्या प्रवाहात सोडून दिल्याने मात्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.