उरण: गुरुवारी उरण मधील चिरनेर खारपाडा मार्गावरील नाल्यात शेकडो मृत मासे आढळून आले आहेत. नाल्यात रसायन युक्त दूषित पाणी सोडल्याने परिसरातील शेतीवरही याचा परिणाम होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी चौकशीची मागणी केली आहे. उरण तालुक्यातील खाडी व नैसर्गिक नाल्यांच्या परिसरात यापूर्वी ही गोदामातून दूषित पाणी सोडल्याने मासे मृत झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
उरण तालुक्यातील चिरनेर ग्रामपंचायत हद्दीतील चिरनेर- खारपाडा रस्त्यालगतच्या गोदामातून दूषित पाणी नाल्यात सोडण्यात आले होते. हे पाणी नाल्यात सोडल्यामुळे संपूर्ण नाल्यातील पाणी लाल झाले होते. त्यामुळे या नाल्यात असणारे मासे तडफडून मृत झाले आहेत. असा शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. परिणामी पुन्हा एकदा उरण मधील माशांच्या प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या प्रदूषणाकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाने लक्ष देण्याची मागणी येथील शेतकरी व स्थानिक मासेमारी करणाऱ्यांनी केली आहे.