नवी मुंबई : महापे एमआयडीसीतील रस्त्यांसाठी बाधित होणाऱ्या २,८२९ वृक्षांची हरकती, सूचना येण्याआधीच तोड सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने पर्यावरणप्रेमी संतप्त झाले आहेत. २५ वृक्षांची तोड केल्याचा आरोप करीत पर्यावरण सेवाभावी संस्थेने एमआयडीसीच्या कार्यकारी अभियंत्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले तर आम आदमी पार्टीनेही यावर हरकत नोंदवली आहे.
पर्यावरणपूरक शहरासाठी वृक्षलागवडीवर भर देणात येत असल्याचा दावा करण्यात येणाऱ्या नवी मुंबई शहरात विकासाच्या नावाखाली मोठय़ा प्रमाणात वृक्षतोड तीही गुपचूप सुरू असल्याचे प्रकार समोर येत आहेत. महापालिकेकडून वाशीतील नियोजित उड्डाणपुलासाठी करण्यात येणाऱ्या वृक्षतोडीस तीव्र विरोध होत असताना एमआयडीसी प्रशासनाने महापेतील रस्त्यांसाठी अडथळा ठरणारे ६१७ वृक्षांची तोड तर २२१२ वृक्षांचे पुनरेपण करण्याचे ठरवले आहे. यासाठी गेल्या आठवडय़ात ठाण्यातील एका स्थानिक कमी खपाच्या वृत्तपत्रात जाहिरात देण्यात आली असून हरकती व सूचनांसाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. हा प्रकार पर्यावरणप्रेमींनी उजेडात आणला आहे. ही सर्व प्रक्रिया कायदेशीर सुरू असल्याचा दावा एमआयडीसी प्रशासनाने केला होता. मात्र नागरिकांच्या हरकती, सूचनांबाबतच प्रक्रिया पूर्ण करण्याआधीच वृक्षतोड सुरू केल्याचा प्रकार समोर आला आहे. आतापर्यंत यातील २५ वृक्षांची तोड केल्याचा दावा करीत मंगळवारी पर्यावरण सेवाभावी संस्थेने महापे येथील एमआयडीसी कार्यालयात कार्यकारी अभियंता राजाराम राठोड यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करीत याबाबत जाब विचारला. अधिकाऱ्यांना जीपीआरएस प्रणालीद्वारे काढलेली छायाचित्रे व चित्रीकरण दाखवण्यात आले. त्यानंतर राठोड यांनी बोटचेपी भूमिका घेतल्याचा आरोप या संस्थेने केला आहे. कंत्राटदारावर कारवाईचे आश्वासन देण्याऐवजी पाहू, करू अशी उडवाउडवीची उत्तरे दिली. याबाबतचे पुरावे सादर केल्यानंतर प्रत्यक्ष पाहणी करून कारवाईबाबत ठरवण्यात येईल असे सांगण्यात आले. त्यामुळे पर्यावरणप्रेमींत संताप व्यक्त होत आहे. ही वृक्षतोड न थांबल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
२५ वृक्ष तोडल्याचा दावा
आतापर्यंत २५ पेक्षा अधिक वृक्ष तोडो असून यात वड, पिंपळ, बाभूळ अशी देशी झाडे आहेत, असा दावा पर्यावरण सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी केला आहे. परवानगी नसतानाही झाडे तोडली आहेत. त्यातील काही झाडे अन्यत्र लावण्यात आली आहेत. मात्र त्याचे योग्य पुनरेपण करण्यात आले नाही असा आरोप शिंदे यांनी केला आहे. बुधवारी हरकती, सूचनांची मुदत संपल्यानंतर वृक्षतोडीबाबत निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे. कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आपचाही इशारा
रस्त्यांसाठीच्या वृक्षतोडीला आम आदमी पक्षाने विरोध करीत हरकत नोंदवली आहे. पक्षाचे मुख्य समन्वयक सुमित कोटियन यांनी या प्रकाराचा तीव्र निषेध व्यक्त करीत, वृक्षतोड त्वरित थांबवावी अन्यथा धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे. समाजमाध्यमांवर याबाबत जनजागृती मोहीम हाती घेतली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
पर्यावरण सेवाभावी संस्थेने दाखवलेल्या वृक्षतोडीच्या पुराव्यांची शहानिशा करण्यात येईल. हा प्रकार जेथे घडला तेथे स्थळ पाहणी करण्यात आल्यानंतर कारवाईबाबत निर्णय घेण्यात येईल.
राजाराम राठोड, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी
हरकतींआधीच वृक्षतोड; पर्यावरणप्रेमी संतप्त, आपचीही हरकत
महापे एमआयडीसीतील रस्त्यांसाठी बाधित होणाऱ्या २,८२९ वृक्षांची हरकती, सूचना येण्याआधीच तोड सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने पर्यावरणप्रेमी संतप्त झाले आहेत.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 01-06-2022 at 00:04 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deforestation before objection environmentalists angry yours too amy