दरवर्षी हिवाळ्याच्या ऋतूमध्ये साधारणपणे ऑक्टोबर अखेरीस व नोव्हेंबर ते डिसेंबरपर्यंत फ्लेमिंगो पक्षांचे मोठया प्रमाणात आगमन होत असते. त्यांचा अधिवास साधारणत: ३ ते ४ महिन्यांचा असतो. मात्र यंदा ऑक्टोबरपर्यंत मान्सून सुरू होता. त्यामुळे हिवाळा लांबल्याने आद्यप नवी मुंबई शहरात फ्लेमिंगोचे स्थलांतर होण्यास सुरुवात झाली नाही. ऐरोली-ठाणे खाडी किनारी २० नोव्हेंबरपर्यंत फ्लेमिंगोचे आगमन सुरू होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
फ्लेमिंगो म्हणजे रोहित पक्षी हे इराण, अफगाणिस्तान आणि इस्त्रायलमधून भारतातील विविध पाणथळ क्षेत्रात हिवाळ्यादरम्यान येत असतात. गुजरातच्या कच्चमधून हजारो किमीचा प्रवास करून हे परदेशी पक्षी समुद्रकिनारी किंवा पाणथळ भागात येत असतात. तसेच नोव्हेंबर ते जास्तीत जास्त जून महिन्यापर्यत वास्तव्यास असतात. त्यांचा मुक्काम कच्छ व्यतिरिक्त माहूल-शिवडी, नवी मुंबईत असतो. ऑक्टोबर अखेरीस किंवा नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच फ्लेमिंगो आगमनाची सुरुवात होते. मात्र ऑक्टोबर पर्यंत मान्सून लांबला होता. नवी मुंबई शहरात म्हणावी तशी थंडीची चाहूल लागली नाही ,त्यामुळे पक्षीप्रेमी फ्लेमिंगो अधिवासाच्या प्रतीक्षेत आहे. नवी मुंबई शहरात नेरूळ, उरण तसेच ऐरोली- ठाणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर फ्लेमिंगोचे दर्शन होत असते. फ्लेमिंगोच्या आगमनाची चाहूल लागताच पर्यटक, पक्षीप्रेमी यांच्या फ्लेमिंगो पाहण्यासाठी नजरा लागतात. ऐरोली येथील सागरी जैवविविधता केंद्रात विशेषता या परदेशी पाहुण्यांना जवळून पाहता यावे याकरिता बोटिंग सफर सुरू असते . मात्र अद्याप त्या ठिकाणी या परदेशी पाहुण्यांचे आगमन झाले नसल्याने ही बोटिंग सफर आहे बंद आहे.
हेही वाचा- उरण रेल्वे स्थानकाच्या कामाला वेग; छप्पर टाकण्याचे काम रात्रंदिवस सुरू
यावर्षी उशिरा आगमन होईल अशी शक्यता पक्षीप्रेमी अभ्यासक यांच्याकडून वर्तविण्यात येत आहे. यंदा मान्सून उशिरापर्यंत सुरू होता. वातावरणात उष्ण दमट हवामान होते. त्यामुळे रोहित पक्षांसाठी असलेली पोषक वातावरणनिर्मिती आद्यप सुरू झाली नसून थंडीची सुरुवात होताच, शहरात फ्लेमिंगो दाखल होण्यास सुरुवात होईल असा अंदाज पक्षीप्रेमी लावत आहेत. बीएचएनएस ‘च्या वतीने मुंबईत हिवाळ्यादरम्यान स्थलांतरीत होणाऱ्या पाहुण्या पक्ष्यांच्या हालचालीवर देखरेख ठेवण्यासाठी त्यांना जीपीएस सॅटेलाईट-टॅग केले आहे. यामध्ये एकूण ६ फ्लेमिंगोना जीपीएस सॅटेलाईट-टॅगिंग केले असून वाशीती ज्या फ्लेमिंगोला जीपीएस टॅगिंग केले होते त्याला नवी मुंबई फ्लेमिंगो असे नाव ही देण्यात आले आहे. मात्र सर्व टॅग केलेले पक्षी कच्छ मध्ये गेले आहेत. त्यामुळे जीपीएस सिग्नल रेंजच्या बाहेर गेले असल्याने बीएनएचएस आता स्थलांतरित पक्ष्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहे.