पनवेल: सध्या दिल्ली ते मुंबई या रस्ते प्रवासाला २४ तास लागतात. केंद्रीय मंत्री नितिन गडकरींनी या दोन्ही शहरांचे प्रवास अंतर १२ तासांवर आणण्यासाठी बडोदा मुंबई महामार्गाचे बांधकाम सरासरी ४५ टक्के पुर्ण झाले आहे. पुढील वर्षी मे महिन्यात हा महामार्ग रहदारीस सूरु होण्याच्या वाटेवर असला तरी या महामार्गाला जोडणारा मुंबईशी जोडणारा विरार अलिबाग बहुउद्देशीय महामार्गाचे भूसंपादन अवघे २२ टक्केच झाल्याने केंद्र सरकारचे दिल्ली मुंबई १२ तासांचे स्वप्न भंगणार अशी चिन्हे आहेत.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी पी.डी. चिटणीस यांनी दिलेल्या माहितीनूसार बडोदा मुंबई महामार्गाचे सात टप्यांमधील बांधकाम सरासरी ४५ टक्के पुर्ण झाले आहे. अनेक टप्यात ८० टक्के बांधकाम झाले आहे. ४० टक्यांच्या खाली कुठेही काम थांबलेले नाही. असाच कामाचे वेग राहील्यास पुढील वर्षी मे महिन्यात हा मार्ग वाहतूकीसाठी खुला करण्याची तयारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची आहे. महाराष्ट्रातील ८ पॅकेज (टप्पे) आहेत. यातील एक टप्पा एमएसआरडीसी करत असून उर्वरीत सात टप्पे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करत आहे. राज्यातील हा महामार्ग बांधण्यासाठी १८ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या असून पुढील वर्षी मे महिन्यात हा महामार्ग वाहतूकीसाठी खुला करण्याची तयारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करत आहे. शेवटच्या टप्यातील बांधकाम मोरबे गावालगत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकऱणाने पुर्ण केले असून माथेरान डोंगररांगा फोडून त्यामध्ये सूमारे साडेचार किलोमीटर लांबीचे दुहेरी बोगद्यातून ही वाहतूक होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या बोगदे फोडून त्यामधील काम ७० टक्के पुर्ण करुन वेळीच हा महामार्ग खुला करण्यासाठी कंबर कसल्याचे पाहायला मिळते. पावसाळ्यात सुद्धा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दुहेरी बोगद्यात जोरदार बांधकाम सूरु ठेवले आहे. पावसाळ्यामुळे कॉंक्रीटीकरणाचे काम बंद आहे. परंतू एकीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जेवढ्या वेगाने बांधकाम करतेय तेवढ्याच संथगतीने विरार अलिबाग बहुउद्देशीय महामार्गाचे भूसंपादन सूरु आहे. मागील अडीच महिन्यात अवघे २२ टक्के संपादन पनवेलमध्ये झाले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पीएमओ कार्यालय तसेच वेळोवेळी एमएसआरडीसीच्या अधिका-यांसोबत बैठक घेऊन हे संपादन लवकर झाल्यास पुढील महामार्गाची जोडणी करता येईल यासाठी पाठपुरावा करुनही संथगतीने भूसंपादन प्रक्रिया सूरु आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारचे १२ तासांमध्ये दिल्ली ते मुंबई प्रवासाचे स्वप्न भंग होईल अशी चिन्हे आहेत.
हेही वाचा : पनवेल: सिडकोने वरिष्ठ नियोजनकार या पदांची भरती प्रक्रीया रद्द केली
बडोदा मुंबई आणि विरार अलिबाग महामार्गांमुळे पनवेलच्या ग्रामीण भागातील पूर्वेबाजूकडील गावांना दळणवळणाचा नवीन पर्याय मिळणार आहे. नैना क्षेत्रातील ४० गावे थेट महामार्गाला जोडली जातील. विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेमध्ये मेट्रो रेल्वेचे नियोजन आहे. एमएसआरडीसी प्रशासनाला विरार अलिबाग महामार्गाच्या भूसंपादनापेक्षा हा रस्ता बांधणा-या ठेकेदारांची निवड प्रक्रियेत रस असल्याने ठेकेदार निवड प्रक्रियेला वेग दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी भूसंपादन प्रक्रियेला वेग दिला नसल्याने यापूर्वी रायगड जिल्हाधिका-यांवर बदलीची कारवाई केली होती.