मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल गाजराची मागणी वाढली आहे . तसेच भोगी निमित्ताने पापडी, वांगी, वालवड , भुईमूग शेंगा, मटार, पावटा यांच्याबरोबरच गाजरची मागणी देखील वाढली आहे. त्यामुळे गाजराच्या दरात वाढ झाली आहे. आधी घाऊक बाजारात १० किलो गाजर १४० ते १६० रुपये दराने उपलब्ध होते. तेच आज बाजारात १६० ते २०० रुपयांवर वधारले आहेत.
हेही वाचा- नवी मुंबई : ‘त्या’ मृतदेहाची ओळख अद्याप पटली नाही, अकस्मात मृत्यू म्हणून नोंद
दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या मकर संक्रांत दिनाच्या आदल्या दिवशी भोगी सण साजरा केला जातो. यामध्ये बऱ्याच प्रकारच्या भाज्या एकत्र करून भाजी आणि सफेद तीळ लावलेली बाजरीची भाकरी खाल्ली जाते . त्यामुळे या दरम्यान बाजारात गाजर, पापडी, वांगी, वालवड , भुईमूग शेंगा, मटार, पावटा या भाज्यांची मागणी वाढली आहे . बाजारात सध्या जोधपुरहुन दाखल होणाऱ्या लाल गाजराची आवक अधिक होत असून आधी १० गाड्या आवक होती ते आता १४ गाड्या आवक झाली आहे. गुरुवारी बाजारात ३५४८ क्विंटल गाजराची आवक झाली आहे. बाजारात गाजरची आवक वाढली असून मागणी त ही वाढ झाली आहे. त्यामुळे दरही वाढले आहेत. घाऊक बाजारात आधी १० किलोला १४० ते १६० रुपये विक्री होत होती, तेच गाजर आता १६० ते २०० रुपये दराने विक्री होत आहेत अशी माहिती व्यापारी शैलेश भोर यांनी दिली आहे. तर किरकोळ बाजारात गाजर प्रतिकिलो ३० ते ४० रुपये उपलब्ध आहेत.