उरण: नवी मुंबई विमानतळास प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि ठाणे, रायगड जिल्ह्यांतील भूमिपुत्रांमध्ये संघर्षाचे वातावरण असताना नेरुळ-उरण या बहुचर्चित रेल्वे मार्गावरील स्थानकांचा नामविस्तार करत या भागातील ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण करण्याच्या दिशेने सिडको प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सिडकोने घेतलेल्या एका निर्णयानुसार उरण स्थानकाचे उरण – कोटनाका, द्रोणागिरीचे द्रोणागिरी – बोकडवीरा, न्हावा-शेवाऐवजी नवघर तर रांजणपाडा स्थानकाचे नाव धुतुम रांजणपाडा आणि गव्हाण स्थानकाचे नवे नाव जासई-गव्हाण असे करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सिडकोने घेतला आहे. हा नामविस्तार करताना यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.

हेही वाचा… नवी मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनाला खिंडार पडणार… 

नवी मुंबईतील वेगवेगळ्या प्रकल्पांच्या नामकरणावरून स्थानिक भूमिपुत्र असलेला आगरी-कोळी समाज आणि या समाजातील नेते नेहमीच संवेदनशील राहिलेले आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात असताना नवी मुंबई विमानतळास शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव तत्कालीन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला होता. या मुद्द्यावरून ठाणे आणि रायगड जिल्ह्यांतील आगरी-कोळी समाजामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्याचे पाहायला मिळाले. नवी मुंबई विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे यासाठी आगरी-कोळी समाजाने मोठे आंदोलन केले. ठाणे, रायगड जिल्ह्यांतील आगरी समाजाचे नेते यासाठी एकवटले होते. तसेच या आंदोलनाला भाजपकडून पडद्याआडून मदत मिळाल्याचेही दिसून आले. भूमिपुत्रांच्या तीव्र भावना लक्षात घेता विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर केला. मात्र केंद्र सरकारच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याने प्रकल्पग्रस्तांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत असतात.

नामविस्तार निवडणुकांच्या तोंडावर?

  • दरम्यान नामकरण अथवा नामविस्ताराच्या मुद्द्यावरून रायगड तसेच ठाणे जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांच्या तीव्र भावना यापूर्वीही दिसून आल्या आहेत.
  • नेरुळ-उरण या बहुचर्चित रेल्वे प्रकल्पात रेल्वे आणि सिडकोने स्थानिकांना विश्वासात न घेता उरण ते खारकोपरदरम्यानच्या दुसऱ्या टप्प्यातील स्थानकांना उरण, द्रोणागिरी, न्हावा शेवा, रांजणपाडा व गव्हाण अशी नावे दिली.
  • या भागांतील ग्रामस्थांनी या स्थानकांना उरण – कोटनाका, द्रोणागिरी – बोकडवीरा, न्हावा शेवा- नवघर, रांजणपाडा – धुतुम व गव्हाण – जासई अशी नावे देण्याची मागणी सिडको आणि रेल्वे विभागाकडे वारंवार केली आहे.
  • या मागणीसाठी ग्रामस्थांनी आंदोलनेही केली. जासई हे तर प्रकल्पग्रस्तांचे मोठे नेते दि. बा. पाटील यांची जन्म आणि कर्मभूमी. त्यामुळे गव्हाण स्थानकाला जासईचे नाव द्यावे यासाठी ग्रामस्थ आक्रमक होते.
  • या मागणीसंदर्भात उरण पोलिसांच्या मध्यस्थीने सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शंतनू गोयल यांच्याबरोबर नुकतेच बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
  • या वेळी सिडकोच्या संचालक मंडळात ठराव करून राज्य सरकारकडे पाठविण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार सिडकोने नामविस्तार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

सिडकोने केलेल्या उरण-खारकोपर रेल्वेमार्गावरील स्थानकांच्या नामविस्तार प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळणार आहे. येथील स्थानिक गावांची नावे हा अस्मितेचा प्रश्न आहे. तो सुटावा याकरिता राज्य केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार आहे. – महेश बालदी, आमदार, उरण

उरणखारकोपर मार्गावरील स्थानकाला धुतुम रांजणपाडा हे जोडनाव देण्यात आले आहे. या प्रस्तावाला आमचा विरोध आहे. या स्थानकाला केवळ धुतुम हेच नाव द्या, ही आग्रही मागणी आहे. याबाबत रेल्वे प्रकल्पग्रस्त म्हणून आंदोलन करणार आहोत. – सुचिता ठाकूर, सरपंच, धुतुम ग्रा.पं.