नवी मुंबई : नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे गेली पाच वर्षे विशेष कार्यकारी अधिकारी असलेले डॉ. राहुल गेठे यांच्या पालिकेतील प्रतिनियुक्तीला बुधवारी माजी खासदार संजीव नाईक व माजी महापौर सागर नाईक यांनी पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेऊन विरोध केला.
प्रतिनियुक्तीचा अधिकार हा राज्य शासनाचा असल्याने आपण या नियुक्तीबाबत कोणताही आक्षेप घेऊ शकत नाही अशा उत्तराने आयुक्तांनी या दोन लोकप्रतिनिधींची बोळवण केली. गेठे यांच्याबरोबर पालिकेच्या माजी साहाय्यक अधिकारी मंगला मालवे यादेखील प्रतिनियुक्तीवर पालिकेत शासनाने पाठविलेल्या आहेत. पण त्यांच्याबद्दल कोणतीही तक्रार नाही.
नवी मुंबई पालिकेत प्रतिनियुक्ती अधिकारी विरुध्द कायमस्वरूपी अधिकारी असा वाद गेली पंधरा वर्षे सुरू आहे. पालिकेचा आर्थिक डोलारा वाढू लागल्यानंतर अनेक अधिकारी हे पालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेले आहेत. पालिकेतील अधिकारी हे पदोन्नतीने या पदाचा कारभार करण्यास सक्षम नसल्याने या प्रतिनियुक्ती अधिकाऱ्यांची रेचलेच सुरू झाली आहे.
पालिकेचा २२ विविध विभागाच्या वतीने कारभार पाहिला जात आहे. एक आयुक्त, दोन अतिरिक्त आयुक्त यांच्यासह ११ प्रतिनियुक्ती व केवळ दोन अधिकारी हे आता काययस्वरूपी राहिलेले आहेत. राज्य शासनाकडून विविध विभागांतील ११ अधिकारी हे प्रतिनियुक्तीवर आलेले आहेत. यात पालिकेतील कायमस्वरूपी अधिकारी कर्मचारी व प्रतिनियुक्ती अधिकारी अशी धुसफुस गेली अनेक वर्षे सुरू आहे. या प्रतिनियुक्तीमध्ये दोन दिवसांपूर्वी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे गेली पाच वर्षे विशेष कार्यकारी अधिकारी राहिलेले डॉ. गेठे यांच्या नियुक्तीची भर पडली. त्यांच्या नियुक्तीला विरोध केला जात आहे.
करोनाकाळात डॉक्टर असल्याने गेठे यांची नियुक्ती पालिकेत उपायुक्त म्हणून करण्यात आलेली होती. त्यांनी त्या काळात खासगी रुग्णालयांबरोबर समन्वय साधून रुग्णशय्या तयार करण्याचे महत्त्वाचे काम केले. मात्र त्यांच्या विरोधात वाशी येथील एका नगरसेविकेने तक्रार केल्याने त्यांची पुन्हा शिंदे यांच्याकडे बदली करण्यात आली. गेठे हे डॉ. श्रीकांत शिंदे यांचे वैद्यकीय महाविद्यालयीन मित्र आहेत. सार्वजनिक क्षेत्रात सेवा करता यावी यासाठी त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतरही शिंदे यांच्याकडे मागील सत्ताकाळात आरोग्य विभागाचा अतिरिक्त भार सोपविण्यात आल्यानंतर विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून विशेष बाब म्हणून पदभार स्वीकारला. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून त्यांची शासकीय सेवेत वर्णी लावण्यात आली. मात्र त्यांनी शिंदे यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याची जबाबदारी सांभाळताना ओएसडी म्हणून गेली दोन वर्षे आणि त्यापूर्वी तीन वर्षे असा पाच वर्षांचा कालावधी कॅबिनेट मंत्र्याकडे पूर्ण केला. करोनाकाळात पाच वर्षांचा कालावधी पूर्ण न झाल्याने अपमानास्पदरीत्या त्यांना माघारी जावे लागल्याने त्यांचा हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर पुन्हा पालिकेच्या उपायुक्त पदावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने नियुक्ती झाली आहे. पालिकेत सध्या कोणाची सत्ता नाही. राज्यातील महाविकास आघाडी सरकारची थेट सत्ता पालिकेवर आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या आदेशाने नियुक्त करण्यात आलेल्या डॉ. गेठे यांना भाजपाकडून पूर्वग्रहदूषित विरोध केला जात असल्याची चर्चा पालिकेत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा