उरण : जेएनपीटी बंदरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी बंदरात अत्याधुनिक सुविधांनी युक्त असे वाहनतळ उभारण्यात आले आहे. असे असतानाही जेएनपीटी बंदर परिसरातच मोठ्या प्रमाणात विविध मार्ग आणि मोकळ्या जागांवर अवजड कंटेनर वाहने उभी केली जात आहेत. अवजड वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या अपघातात दुचाकी वाहनधारकांना आपला जीव गमवावा लागत आहे. जेएनपीए बंदर आणि उरणला जोडणाऱ्या दोन्ही राष्ट्रीय महामार्गातील सेवा मार्गावरील बेकायदा जड कंटेनर वाहनतळाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या वाहनांमुळे अनेक अपघाताच्या घटना वाढल्या असून नागरिकांकडून वाहतूक विभागाकडे कारवाईची मागणी केली जात आहे.

उरण परिसरात ये-जा करणारी हजारो जड कंटेनर वाहने बेदरकारपणे हाकली जात आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यापैकी अनेक वाहनांवर मद्यपान करून वाहन चालविणारे, अप्रशिक्षित तसेच विना वाहनचालक सहाय्यक(क्लिनर) शिवाय,तसेच दिशा दर्शक दिवे यांचा ही अभाव असतांना अशी वाहने चालविली जात असल्याने अपघात होत आहेत.

जेएनपीए बंदरातून दररोज १५ हजारापेक्षा अधिक जड कंटेनर वाहने उरणच्या जेएनपीए बंदर ते पळस्पे व जेएनपीए ते आम्रमार्ग नवी मुंबई या दोन्ही राष्ट्रीय महामार्गावरून वाहतूक करतात. यातील अनेक वाहने बेदरकारपणे वाहतूक करतात. याचा फटका या मार्गावरून प्रवास करणाऱ्या दुचाकी व हलक्या वाहनांना बसत आहे. त्यामुळे अनेक वाहनांना या कंटेनर वाहनांकडून धडका दिल्या जात आहेत. त्यात त्यांचे नुकसान होत आहे. या अपघातांनंतर जड वाहन चालक व मालकाकडून ही ज्या वाहनाना धडक बसली आहे. त्यांची नुकसानभरपाई न देता उलट दमदाटी केली जात असल्याचे अपघातात नुकसान झालेल्या वाहन मालकांचे म्हणणे आहे.

आमसभेतही विषय

जेएनपीए बंदराला जोडणारे जेएनपीटी ते पळस्पे व जेएनपीटी ते नवी मुंबई असे दोन राष्ट्रीय महामार्ग आहेत. या दोन्ही मार्गावरून मोठ्या प्रमाणात प्रवासी व हलकी वाहने तसेच दुचाकी वाहने प्रवास करीत आहेत. मात्र या जड व लांबीच्या कंटेनर वाहनांचा अंदाज न आल्याने अनेक अपघात मार्गावर होत आहेत. नुकताच झालेल्या उरणच्या आमसभेत हा मुद्दा प्रकर्षाने मांडला गेला. याची दखल घेत येथील बेकायदा वाहनतळ आणि त्यामुळे होणारे अपघात या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी उरणचे आ. महेश बालदी उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करणार आहेत. मात्र जेएनपीटीने बंदरातील आयात निर्यात मालाची ने-आण करणाऱ्या वाहनांची तळे उभारण्यात आली आहेत.

Story img Loader