नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका हद्दीत नव्याने उभ्या राहत असलेल्या बेकायदा बांधकामांविरोधात तातडीने कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले असतानाही महापालिकेच्या काही विभाग अधिकाऱ्यांकडून याकडे कानाडोळा केला जात असल्याचा प्रकार उघडकीस येत आहे. येथील गोठीवली भागात सिडकोच्या जागेवर बेकायदा इमारत बांधण्याचा प्रकार राजरोसपणे सुरू असताना त्याविरोधात महापालिकेकडे तक्रारी करणाऱ्या रहिवाशांना वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या जात आहेत. विशेष म्हणजे रात्री अपरात्री या ठिकाणी वृक्षतोडीच्या घटनाही घडत आहेत.
नवी मुंबई पालिका हद्दीतील वाढत्या बेकयदा बांधकामांची दखल उच्च न्यायालयाकडून घेण्यात आली आहे. यासंदर्भात बेकायदा बांधकामांची काही छायाचित्रे याचिकाकर्त्यांनी न्यायालयात सादर केल्याने महापालिका प्रशासनाने मध्यंतरी कारवाईची मोहीम हाती घेतली होती. त्यानंतर सिडकोच्या अल्प उत्पन्न गटातील वसाहतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना नोटिसा धाडण्याचे सत्रही पालिकेने सुरू केले होते. नव्या बांधकामांकडे कानाडोळा करत जुन्या बांधकामांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना नोटिसा बजावून त्यांना महापालिका कार्यालयामध्ये बोलावण धाडल्याचे प्रकारही उघडकीस येऊ लागले होते. मध्यंतरी महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी वाशी आणि कोपरखैरणे विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांची बदली करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरही इतर विभागांमध्ये काम करणारे अधिकारी शहाणे होण्यास तयार नाही.
गोठीवली येथील शंकर मंदिर रोड परिसरात एका अधिकृत इमारतीतील रहिवाशांच्या तक्रारीनंतरही लगतच सुरू असलेल्या बेकायदा बांधकामांकडे डोळेझाक केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गोठीवली येथील शंकर मंदिर रोड परिसरात सिडकोची जमीन आहे. परंतु गेल्याकाही दिवसांपासून सिडकोच्या जागेवर अनधिकृत बांधकाम होत असल्याचा आरोप येथील विघ्नहर्ता को-ऑपरेटिव्ह सोसायटी आणि शंकर अपार्टमेंटमेंटमधील रहिवाशांनी केला आहे. या अनधिकृत बांधकामासाठी येथे मोठ्या प्रमाणात बांधकाम साहित्य टाकण्यात आले आहे. येथील मोकळ्या जमिनीवर पूर्वी मोठ्याप्रमाणात वृक्ष होते. परंतु आता इमारत बांधली जात असल्याने रात्रीच्या वेळेत येथे अनेक वृक्षांची कत्तल सुरू करण्यात आल्याचा आरोपही रहिवाशांनी केला.
मागील दोन वर्षांपासून येथील रहिवासी सिडको, महपालिका आणि पोलिसांकडे तक्रारी करत आहेत. परंतु त्याची दखल घेतली जात नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. काही दिवसांपूर्वीच रहिवाशांनी महापालिकेला रहिवाशांची स्वाक्षरीचे पत्र दिले आहे. परंतु कोणतीही कारवाई झाली नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
कारवाईविना रहिवासी त्रस्त
आम्ही एकूण ६० कुटुंब या ठिकाणी राहतो. आमच्या इमारती समोरच बेकायदेशीरपणे इमारत उभी केली जात आहे. यासंदर्भात तक्रारी करुनही कोणतीही कारवाई होत नसल्याने सर्व त्रस्त असल्याचे रहिवाशांनी सांगितले. यासंबंधी अतिरिक्त आयुक्त राहुल गेठे यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही तो होऊ शकला नाही. स्थानिक विभाग अधिकाऱ्याकडूनही प्रतिसाद मिळाला नाही.