नवी मुंबई : नवी मुंबईतील तुर्भे सेक्टर १९ एफ येथील भूखंड क्रमांक १ व ४ वरिल अनधिकृत झोपडपट्टी, व्यवसायिक गाळे, गॅरेज व वाहन पार्किंग बाबत वारंवार तक्रार, आंदोलन करूनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. मागील महिन्यातही जन आंदोलन पुकारण्यात आले होते. त्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेने कारवाईचे आदेशदेखील दिले आहेत मात्र विविध कारणास्तव कारवाई करण्यासाठी तारीख पे तारीख मिळत आहे. त्यामुळे आता येथील नागरिक आयुक्तांच्या दालनात आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.
वाशी,सेक्टर १९ एफ तुर्भे येथील भूखंड क्रमांक १ व ४ वर अतिक्रमण करून या ठिकाणी अनधिकृत झोपडपट्टी, व्यवसायिक गाळे, गॅरेज व अनधिकृत अवजड वाहन पार्किंग करण्यात येते. या भूखंडाच्या हाकेच्या अंतरावर दोन इंटरनॅशनल शाळा आहेत. तसेच या परिसरात सिडकोने निर्माण केलेल्या वसाहतीत तसेच इमारतीत २५ हजारांपेक्षा जास्त नागरिक राहतात. तसेच त्याच्या लगतच मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. अशा गजबजलेल्या परिसरात राजरोसपणे झोपडपट्टीतून अंमली पदार्थांची विक्री, बांगलादेशी नागरिकांचे छुपे वास्तव्य, रात्रीच्या वेळी उघड्यावर देह व्यापार, अनधिकृत ट्रक टर्मिनल सुरू आहे. यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. गेल्या काही वर्षांपासून सेक्टर २६ मधील अनेक लोकप्रतिनीधी, समाजसेवक, गृहसंकुल तसेच नागरिकांच्या वतीने वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र आतापर्यंत प्रशासनाकडून कोणतीही कडक कारवाई करण्यात आलेली नाही.
डिसेंबरमध्ये या ठिकाणी जनआंदोलन पुकारण्यात आले होते. त्यावेळी आमदार गणेश नाईक यांनी त्यांचा ताफा थांबवून आंदोलनादरम्यान नागरिकांची चौकशी केली आणि हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. तसेच नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त यांनी येथील अनधिकृत झोपडपट्टी निष्कासित करण्याचे आदेश देखील दिले आहेत. जानेवारी मध्ये १३ जानेवारी, २३ जानेवारी आणि त्यांनतर ३० जानेवारी या तीन तारीख देण्यात आल्या होत्या, मात्र विविध कारणे देऊन येथील कारवाई पुढे ढकलण्यात येत आहे.
तुर्भे येथील मोकळ्या भूखंडावरील अतिक्रमणबाबत वारंवार तक्रारी तसेच आंदोलन करून देखील ठोस कारवाई होत नाही. पालिकेने येथील अतिक्रमण निष्काषित करण्याच्या आदेश दिले असतानाही प्रत्यक्ष कारवाईसाठी केवळ विविध तारखा दिल्या जात आहेत. त्यामुळे आता आम्ही महापालिका आयुक्तांच्या दालनातच आंदोलनाला बसणार आहोत. संकेत डोके, अध्यक्ष, नागरी कृती समिती