नवी मुंबई शहरातून जाणाऱ्या सायन पनवेल महामार्गावरील उड्डाणपूल दूर अंतराचे व उंच असून त्याखालील जागा मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता तसेच बेघरांचे झोपड्या बांधून वास्तव्य वाढले होते. त्यामुळे स्वच्छता सर्वेक्षणात बाधा ठरत होते. ही अस्वच्छता दूर करण्यासाठी अशा उड्डाणपूलाखाली लोखंडी जाळी बसून अस्वच्छता पसरविण्यावर अटकाव घालण्यात आलेला आहे. सानपाडा उड्डाणपूलाखाली ही जाळी उभारण्यात आलेली आहे. परंतु तरीदेखील जाळीच्या आतमध्ये कचरा टाकून अस्वच्छता पसरविण्यात आली आहे. या बेघरांनी रस्त्यावरच आपली चूल मांडलेली आहे. त्यामुळे परिसरात अस्वच्छता कायम आहे.
सानपाडा उड्डाणपूल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येत असला तरी उड्डाणपुलाखालील अस्वच्छतेमुळे तसेच देशातील व राज्यातून ठिकठिकाणाहून येऊन उड्डाणपुलाखाली आश्रय घेतलेल्या बेघरांमुळे शहरात मुख्य रस्त्यालगत अस्वच्छता पसरवली जात होती. त्यामुळे शहर स्वच्छतेला मोठ्या प्रमाणावर हानी पोहचत आहे. एका बाजूला १० ते ४० लाख लोकसंख्येच्या मोठ्या शहरांमध्ये देशातील सर्वप्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून मानांकन मिळविताना व ते उंचाविण्यासाठी जोमाने प्रयत्न केले जात आहेत.
हेही वाचा- नवी मुंबई : नेरुळ पूर्व पश्चिम जोडणारा उड्डाणपूल १२ वर्षापासून परवानगीच्या प्रतिक्षेत
तर दुसऱ्या बाजूला बेघर लोकांमार्फत उड्डाणपुलांखाली निर्माण होणाऱ्या अस्वच्छतेला आळा बसावा याकरिता सानपाडा रेल्वे स्टेशनसमोर शीव- पनवेल महामार्गावर असणाऱ्या उड्डाणपुलाखाली दोन्ही बाजूने जाड ग्रील्सचे ११ फूटी उंच कुंपण घालण्यात आलेले आहे. उड्डाणपूलाखालील अस्वच्छ वातावरण दूर करण्याच्या दृष्टीने हे कुंपण घालण्यात आले आहे. असे असली तरी जाळीचे कुंपण घालूनही उड्डाणपूला खाली जाळीच्या आत मध्ये घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसत आहे. तसेच हे बेघर नागरिक आतमध्ये जाऊन कचरा करत असल्याचे निदर्शनात येत असून रस्त्यावर चूल मांडली आहे. यामुळे या उड्डाणपूलाखाली झोपड्या नाहीश्या झाल्या असल्या तरी अस्वच्छता मात्र जैसे थेच आहे.