नवी मुंबई : नवी मुंबईचा राणीचा रत्नहार समजल्या जाणाऱ्या पामबीच मार्ग ओलांडताना आतापर्यंत ११ ग्रामस्थांचा जीव गेला आहे. मासेमारीकरिता समुद्रात जाण्यासाठी भल्या पहाटेच पामबीच मार्ग ओलांडताना या ग्रामस्थांचा जीव गेला आहे. त्यावर उपाय म्हणून करावे गावाजवळ पामबीच मार्गावर कोट्यवधी रुपये खर्चातून भुयारी मार्ग उभारला आहे. तरीही ग्रामस्थ जीव धोक्यात घालून वेगवान पामबीच मार्ग ओलांडतात. भुयारी मार्गातून जाण्याऐवजी पामबीच मार्ग ओलांडण्याचा ‘शॉर्टकट’ धोकादायक असून नागरिकांनी पामबीच मार्गावर लावलेल्या बॅरिकेड्स काढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पामबीच मार्गावर सुसाट वेगाने धावणाऱ्या गाड्या पाहायला मिळतात. या मार्गावर ताशी ६० किमी वेगाची मर्यादा असताना अतिवेगाने धावणाऱ्या गाड्यांमुळे अपघात होतात. तर दुसरीकडे नियमबाह्य वाहने चालवून सिग्नल तोडणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे अनेक अपघात घडतात. त्यात अनेकांना प्राणही गमवावे लागले आहेत. करावे गाव येथून नवी मुंबई विकसित होण्यापूर्वीपासून पामबीच मार्गावर मिठागरे तसेच करावे खाडी येथून मुंबईहून मासे आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात मच्छीमार बांधव पामबीच मार्ग ओलांडून जातात.

हेही वाचा…विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेचे काम रखडणार? भूसंपादन मोबदलाच्या फाईल एमएसआरडीसीने परत मागवल्या

पहाटेच्या वेळी रस्ता आोलांडताना आतापर्यंत ११ ग्रामस्थांचा अपघातात जीव गेला आहे. त्यामुळे स्थानिक नगरसेवक म्हात्रे दाम्पत्य यांनी भुयारी मार्गाची मागणी केली व पालिकेच्या माध्यमातून परिसरात भुयारी मार्ग बांधला तसेच या भुयारी मार्गाच्या प्रवेशद्वारावरच पामबीच मार्गावर अपघाती निधन झालेल्या ११ जणांच्या नावांच्या पाट्या लावल्या आहेत. परंतू तरीदेखील मासेमारी करण्यासाठी जाणारे ग्रामस्थ आजही वेगवान पामबीच मार्ग ओलांडून जातात. त्यामुळे या मार्गावर अपघाताची दाट शक्यता आहे.

पामबीच मार्गावर दोन्ही दिशांना पालिकेने रस्ता ओलांडू नये म्हणून बॅरिकेड्स लावले आहेत. परंतू या बॅरिकेड्स काही ठिकाणी तोडून टाकण्यात आल्या असून जीवघेण्या शॉर्टकटचा वापर केला जात आहे. त्यामुळे भुयारी मार्गाची सुविधा असताना धोका पत्करून पामबीच मार्गाचा वापर करणे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे नागरिकांनी याबाबत खबरदारी बाळगणे आवश्यक आहे. याच भुयारी मार्गाला श्री बामणदेव भुयारी मार्ग असे नाव देण्यात आले आहे.

पामबीच मार्गाच्या खाडीच्या दिशेला टी एस चाणक्य तलाव असून त्याच्याच बाजूने बामणदेव मंदिर तसेच छोट्या बोटीद्वारे मुंबईकडे जाणाऱ्या मासेमारी करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे पहाटेच्या वेळी तसेच सायंकाळी भरधाव पामबीच मार्ग ओलांडणे अत्यंत धोकादायक आहे. याबाबत वाहतूक विभागानेही योग्य ती कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे.

हेही वाचा…पुण्यातील घटनेचा धसका ? नवी मुंबईत रात्रभर डान्स बार, पब च्या अनधिकृत बांधकामावर हातोडा

पामबीच मार्ग ओलांडताना जीव गमवाव्या लागलेल्या व्यक्तींच्या स्मरणार्थ त्यांच्या नावांच्या पाट्या भुयारी मार्ग प्रवेशद्वारावर लावूनगी त्यातून कोणत्याही प्रकारचा बोध नागरिक घेत नाहीत हे आश्चर्य आहे. पामबीच मार्गावर अशा प्रकारे लावलेले पत्र्याचे बॅरीकेड्स चालत रस्ता ओलांडण्यासाठी तसेच दुचाकीने जाण्यासाठी तोडून ठेवले आहेत.

पामबीच मार्गाजवळील करावे गावातून पामबीच मार्ग ओलांडून जाणे अत्यंत धोकादायक आहे. वारंवार नागरिकांना सूचना देऊन भुयारी मार्गाचा वापर करा असे सांगीतले जाते. याबाबत ग्रामस्थांची बैठक घेऊन पुन्हा सूचना देण्यात येतील. – कृष्णा धामापूरकर, वरिष्ठ वाहतूक पोलीस निरीक्षक, सीवूड्स

ग्रामस्थांनी पामबीच ओलांडताना भुयारी मार्गाचा वापर करावा. वेगवान मार्ग ओलांडणे धोकादायक आहे. भुयारी मार्गाची निर्मिती नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी केली आहे. त्याचा वापर करावा. – विनोद म्हात्रे, माजी नगरसेवक

हेही वाचा…नवी मुंबई: आरटीओची ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाई

पालिकेने भुयारी मार्ग बनवला आहे. पामबीच मार्गावरुन जाणे धोकादायक आहे. पालिकेने पावसाळी काळात या भुयारी मार्गाकडे लक्ष द्यावे. पावसाळ्यात या ठिकाणी भुयारी मार्गात पाणी साचते. त्याबाबतही काळजी घ्यावी. – सुमित्र कडू, पदाधिकारी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Despite subway villagers risk lives crossing navi mumbai s pambeach road safety concerns persist psg