नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील ऐरोली मतदारसंघात गणेश नाईक हे त्यांच्या आधीच्या मतांचा विक्रम मोडून निवडून येतीलच, मात्र बेलापूरमध्येही आम्ही विजय मिळवू, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी रात्री उशिरा भाजप नेते गणेश नाईक यांच्या उपस्थितीतच केला. बेलापूर मतदारसंघात बंडखोरी झाली आहे. मात्र तेथेही मंदा म्हात्रे बहुमताने निवडून येतील. आमच्याशी बंडखोरी करणाऱ्यांनी स्वत:ची ताकद अजमावून पाहावी, असे आव्हान त्यांनी नाईकांसमोरच संदीप यांना दिले.
कल्याण, डोंबिवली परिसरांतील सभा आटोपून मंगळवारी रात्री देवेंद्र फडणवीस गणेश नाईक यांच्या खैरणे एमआयडीसी येथील कार्यालयात आले. या वेळी त्यांनी तातडीची पत्रकार परिषद बोलावली. गणेश नाईक यांच्या उपस्थितीतच त्यांनी संदीप नाईकांना आव्हान देत मंदा म्हात्रे यांच्या विजयाची खात्री दिली. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांत भांडण सुरू झाले आहे. महाराष्ट्रात १०० टक्के भाजप निवडून येणार असल्याचा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला. बेलापूर मतदारसंघात मंदा म्हात्रे विजयाची हॅटट्रीक करतील असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. गणेश नाईक हे ऐरोली मतदारसंघात निवडणूक लढवत असून नाईक हे त्यांच्या मतांचा विक्रम यंदा मोडतील, असा दावाही त्यांनी केला. राज्यभरात झालेल्या सभांमधून नागरिकांनी महायुतीला निवडून देण्याचा निश्चय केला असून कोणीही कोणत्याही प्रकारची आव्हाने देवोत, महाराष्ट्रात १०० टक्के महायुतीचीच सत्ता येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. नवी मुंबई शहरात गणेश नाईक गेली अनेक वर्षे सातत्याने निवडून येत असून नवी मुंबई घडवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
हेही वाचा – ऐरोलीतील बंडखोरांना शिंदे गटाचे अभय? बेलापुरात कारवाई, ऐरोलीत आस्ते कदम
अमित शहांची सभा
बेलापूर विधानसभा मतदारसंघात येत्या १८ तारखेला गृहमंत्री अमित शहा यांची सभा होईल, अशी माहिती या वेळी पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी दिली. नेरुळ येथील रामलीला मैदानात या सभेचे आयोजन करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.