नवी मुंबई : मालमत्ताकर थकबाकीच्या नोटीस बाजाविल्यानंतरही दुर्लक्ष करणाऱ्या मालमत्ताधारकाविरोधात नवी मुंबई महापालिकेने ढोलताशे मोहीम हाती घेतली आहे. महापालिकेच्या तुर्भे विभाग कार्यालयाने रेनबो बिझनेस पार्क येथील हावरे कमर्शियल काॅम्प्लेक्समध्ये मालमत्ताकराची थकबाकी करणाऱ्या २३२ आस्थापनांबाहेर ढोलताशे वाजवून त्यांना कर थकबाकी भरण्यासाठी जागे केले. १ कोटी २५ लाख रुपयांची मालमत्ताकर थकबाकी करणाऱ्या थकबाकीदारांच्या नावांची यादीही हावरे कमर्शियल काॅम्प्लेक्समध्ये जाहीरपणे लावण्यात आली.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात अनेक मालमत्ताधारकांनी मालमत्ताकराची थकबाकी ठेवली आहे. महापालिकेने नोटीसा बजावूनही या मालमत्ताधारकांकडून थकित मालमत्ताकर भरला जात नव्हता. अखेर महापालिकेच्या तुर्भे कार्यायाने रेनबो बिझनेस पार्क येथील हावरे कमर्शियल काॅम्प्लेक्समध्ये ढोलताशे मोहीम हाती घेतली. प्रशासकीय अधिकारी संजय तडवी यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई करण्यात आली. हावरे कमर्शिअल काॅम्प्लेक्समध्ये एकूण २५३ आस्थापना आहेत. त्यातील २१ आस्थापनांनी मालमत्ताकर भरलेला आहे. उर्वरित २३२ आस्थापनांबाहेर ढोलताशे वाजवून त्यांना मालमत्ताकर भरण्यासाठी जागे करण्यात आल्याचे तडवी यांनी सांगितले. शिवाय थकबाकीदारांच्या नावांची यादी त्यांनी करभरणा करणे बाकी असलेल्या रकमेसह त्यांच्या आस्थापनांबाहेर लावण्यात आली. ३१ मार्च पूर्वी मालमत्ताकराची थकबाकी भरा, अन्यथा मालमत्ता सील करण्यात येईल असा इशाराही कर थकबाकीदार आस्थापना मालकांना देण्यात आला आहे. अशाप्रकारे करवसुलीची कार्यवाही नवी मुंबई महानगरपालिकेने इतरही ठिकाणी केली. तुर्भेच्या भूमिराज सोसायटीमध्ये ढोलताशे वाजवून अडीच कोटी रुपयांची करवसुली करण्यात आली. नेरूळच्या अमेय सोसायटीने साडेतीन कोटी रुपये मालमत्ताकराचा संपूर्ण भरणा केल्यामुळे सील केलेल्या मालमत्ता मोकळ्या करण्यात आल्या.

मालमत्ताकर थकबाकीदारांना कर भरण्यासाठी कोणतेही आर्थिक दडपण येऊ नये यासाठी नवी मुंबई महापालिकेने ‘अभय’ योजना सुरू केली आहे. मालमत्ताकर थकबाकीवरच्या शास्तीवर ५० टक्क्यांची सूट देणाऱ्या अभय योजनेचा लाभ घ्यावी आणि ३१ मार्च २०२५ या तारखेपूर्वी २०२४-२०२५ या आर्थिक वर्षाचा मालमत्ताकर भरावा असे आवाहन महापालिका आयुक्त डाॅ. कैलास शिंदे यांनी केले आहे. यापूर्वीही महापालिकेने वाशीच्या कृषी उत्पन्न बाजारातील एक्स्पोर्ट भवनमधील १० आस्थापनांवर कार्यवाहीचा बडगा उचलला होता. या आस्थापनांची ५६ लाख रुपयांची मालमत्ताकर थकबाकी असल्यामुळे त्यांना नवी मुंबई महापालिकेद्वारे सील लावण्यात आले होते. दोन दिवसांत या मालमत्ताकरधारकांनी थकबाकी भरल्यामुळे त्या सीलमुक्त करण्यात आल्या होत्या अशी माहिती तडवी यांनी दिली.