नवी मुंबई – नवी मुंबई महापालिकाक्षेत्रात मोठ्या प्रमाणात उद्याने आहेत. विविध ठेकेदारांना देखभालीसाठी उद्याने दिली जात आहेत. याच उद्यानात विविध खेळाचे साहित्य नागरिकांच्या करमणुकीसाठी बसवले जाते. परंतु, अनेक उद्यानात साहित्याची मोडतोड व स्वच्छतेबाबतच्या तक्रारी आढळून येत असताना नवी मुंबईतील नेरुळ विभागातील मदर टेरेसा उद्यानात हत्ती जमिनीवर पडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई शहरात बेलापूर ते दिघा परिसरात अनेक देखणी उद्याने आहेत. या उद्यानांची देखभाल व दुरुस्ती ठेकेदारांकरवी केली जाते. परंतु, अनेक उद्यानांच्या देखभालीकडे दुर्लक्ष होते. स्वच्छता तसेच उद्यानातील मुलांसाठीची खेळाची व करमणुकीची साधने तुटलेल्या असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जातात. सध्या शहरातील शाळांना उन्हाळी सुट्टी लागल्याने शहरातील बेलापूर ते दिघा या सर्वच विभागात सकाळी व सायंकाळी बच्चे कंपनीची व पालकांची गर्दी पाहायला मिळते. परंतु, अनेक उद्यानात कमी जास्त प्रमाणात स्वच्छतेच्या व खेळाच्या साहित्याच्या मोडतोडीच्या तक्रारी प्राप्त होतात. एकीकडे देशभरात नवी मुंबई महापालिकेला स्वच्छतेबाबत गौरवलेले आहे. शहरात नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा तसेच खेळाची उद्याने मोठ्या प्रमाणात असून त्यांची वेळेवर देखभाल करण्याची आवश्यकता आहे.

हेही वाचा – दुचाकी पार्क करून कार चोरून पुण्याला धूम ठोकली, आणि इकडे पार्क केलेल्या दुचाकीवरून पोलिसांनी चोरट्याला जेरबंद केले – वाचा नेमके काय झाले

नेरुळ विभागातील मदर टेरेसा उद्यानातही मागील अनेक वर्षांपासून मुलांना खेळण्यासाठी भला मोठा हत्ती होता. या प्लॅस्टिकच्या हत्तीची दुरावस्था झाली होती. मुलांना शिडीवरून हत्तीच्या अंबारीत जाता येत असे. परंतु, या खेळण्यातील हत्तीवर चढण्यासाठी असलेल्या पायऱ्या तसेच विविध भाग खराब झाले होते. त्यामुळे हा उद्यानातील मुलांसाठीच्या खेळण्यातील हत्ती कधीही कोसळले अशी स्थिती होती. त्यामुळे पालिकेने प्लॅस्टिकच्या या हत्तीला काढून जमिनीवर उद्यानातच आहे त्या ठिकाणी ठेवले असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

याबाबत खेळण्यासाठी आलेल्या मुलांना व पालाकंना विचारले असता हत्तीची मोठी प्रतिकृती खराब व पडण्याच्या स्थितीत होती. परंतु, हत्ती खाली कोसळला की पालिकेने दुरुस्तीसाठी काढून ठेवला याबाबत काही माहिती नसल्याचे नागरिकांनी सांगितले. परंतु, मागील दोन चार दिवसांपासून या हत्तीची प्रतिकृती अशीच पडून असल्याचे उद्यानात उपस्थित असलेल्यांनी सांगितले. खेळायला येणारी मुले मात्र हत्ती कोसळला.. हत्ती कोसळला असे बोलून मजा घेत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. पालिकेकडून एकीकडे करोडो रुपये स्वच्छ अभियानात खर्च केले जात असताना उद्यानाच्या देखभालीकडे तात्काळ लक्ष देण्याची अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा – नवी मुंबई : पंतप्रधानांच्या १०० व्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे ऐरोली विधानसभा क्षेत्रात १०० ठिकाणी प्रक्षेपण

नेरुळ विभागातील मदर टेरेसा उद्यानात दुरुस्तीचे काम सुरू आहे. उद्यानात खेळण्यासाठीचा हत्ती हा खराब झाल्याने तो काढून ठेवण्यात आला आहे. त्याचा आकार खूप मोठा असून गाडी प्राप्त होताच तो योग्य ठिकाणी घेऊन जाण्यात येईल, असे नेरुळ विभाग, सहाय्यक उद्यान अधिकारी, दिपक रोहेकर म्हणाले.

घरातील मुलांना खेळण्यासाठी मदर टेरेसा उद्यानात दररोज घेऊन जातो. हत्तीची मोडतोड झाली होती. परंतु, मागील दोन तीन दिवसांपासून हत्तीची मोठी प्रतिकृती पडूनच आहे. पालिकेने तात्काळ या ठिकाणाहून ती हलवावी व त्या ठिकाणी नवीन प्रतिकृती लावावी, अशी मागणी नेरुळ येथील मोहम्मद जियाउद्दीन यांनी केली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Did the elephant fall down in the navi mumbai mnc park neglect of mnc parks department ssb
Show comments